वॉशिंग्टन : अमेरिकेतील ओकलाहोमा येथील तिहेरी हत्याकांड प्रकरणात धक्कादायक माहिती उघड झाली आहे. ज्या क्रूरतेने आरोपीने हत्या केली, ते ऐकून सर्वच हादरून गेले. खुद्द पोलीसही चक्रावून गेले. या प्रकरणात पोलिसांनी लॉरेन्स पॉल अँडरसन याला अटक केली असून, एकाच कुटुंबातील तिघांची हत्या केल्याचा त्याच्यावर आरोप आहे.
ओकलाहोमा स्टेट ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनच्या माहितीनुसार, अँडरसनने शेजारच्या कुटुंबातील तिघांची हत्या केली. त्यात ४१ वर्षीय एंड्रिया लीन ब्लेंकशिप हिचाही खून केला आहे. तिच्या हत्येनंतर आरोपीने चाकूने तिचे हृदय बाहेर काढले. त्यानंतर बटाट्यासोबत ते शिजवले आणि पीडितेच्या कुटुंबातील लोकांना जेवणासोबत वाढले. आरोपी अँडरसन हा जानेवारीतच तुरुंगातून सुटून बाहेर आला होता. तो तुरुंगातून सुटल्यानंतर इतके भयानक कृत्य करील, याचा विचारही कुणी केला नसेल.
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी अँडरसनने हत्येमागचे कारण सांगितले आहे. आपल्या कुटुंबीयांना राक्षसांपासून वाचवण्यासाठी त्याने हे कृत्य केल्याची कबुली दिली. अँडरसनने एंड्रियासह ६७ वर्षीय लियोन पेइ आणि त्यांची चार वर्षांची नात काइओस हिचीही हत्या केली. या हल्ल्यात लियोन पेइची पत्नी गंभीर जखमी झाली आहे. हे कुटुंब आरोपीच्या शेजारीच राहत होते.
आरोपी अँडरसन याला कोर्टात हजर करण्यात आले. त्यावेळी तो रडू लागला. मला जामीन नको, असे त्याने कोर्टात सांगितले. अँडरसनच्या वकिलांनी सांगितले की, आरोपीच्या मानसिक तपासणी केली जाईल. हा खटला लढवण्याच्या स्थितीत आहे की नाही याचा तपास केला जाईल. अँडरसनला २०१७मध्ये ड्रग्ज प्रकरणात दोषी ठरवून २० वर्षांची शिक्षा सुनावली होती. मात्र, या वर्षी जानेवारीत त्याची सुटका करण्यात आली होती.