मुंबई : राज्यातील वाढत्या कोरोना रूग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यातील जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी लॉकडाऊन करायचा का ? असा थेट सवाल करीत याबाबत मी पुढचे आठ दिवस पाहणार असल्याचे त्यांनी सांगत एक प्रकारे राज्यातील जनतेला अल्टिमेटम दिला आहे. ज्यांना लॉकडाऊन नकोय ते मास्क घालून फिरतील,ज्यांना हवाय ते विना मास्क फिरतील असे सांगतानाच मास्क घाला आणि लॉकडाऊन टाळा असेही आवाहन त्यांनी केले.वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उद्यापासून सर्व राजकीय,सामाजिक,धार्मिक मिरवणुका मोर्चे आणि यात्रांवर बंदी घालण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.
मुंबई,पुणे,नाशिकसह विदर्भातील शहरांमध्ये करोनाचा संसर्ग पुन्हा एकदा झपाट्याने वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेशी संवाद साधला.कोरोनाची लाट पुन्हा आपल्या राज्यात आली की नाही हे पुढील आठ ते पंधरा दिवसात कळेल.मात्र आता राज्यातील जनतेवर थोडेसे बंधने आणणे गरजेचे असल्याचे सांगून, त्यानुसार उद्यापासून सर्व राजकीय,सामाजिक,धार्मिक मिरवणुका मोर्चे यात्रांवर बंदी घालण्यात आल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.पक्ष वाढवू, पण कोरोना नाही.पक्ष वाढवायचा आहे जरुर वाढवा,पण कोरोना नका वाढवू, असे सांगून शासकिय काम झूम मिटींगवर करण्याचे आदेश दिले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.तसेच, माझे कुटूंब माझी जबाबदारी या मोहिमे प्रमाणे राज्यात ‘मी जबाबदार’ ही नवीन मोहीम सुरु करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. मास्क घाला, हात धुवा आणि सामाजिक अंतर पाळा या तीन गोष्टी करा असेही आवाहन त्यानी जनतेला केले.
उद्या रात्रीपासून जिथे जिथे वाटते तिथे बंधने घालण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.अचानक लॉकडाऊन करणे घातक असल्याने अचानक लॉकडाऊन घोषित करु नका,जनतेला चोवीस तासाचा वेळ द्या असेही मुख्यमंत्री ठाकरे यांनी स्पष्ट केले. राज्यात सध्या ५३ हजार सक्रिय रुग्ण आहेत. अमरावती जिल्ह्याची परिस्थिती चिंताजनक असून,पुन्हा एकदा आपल्याला बंधन पाळावी लागणार असल्याचे सागताच कोरोनाची दुसरी लाट दरवाज्यावर धडक मारतेय असा इशारा मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिला.कोविड योद्धा होता नाही आले तर कोविड दूत तरी होऊ नका असेही मुख्य़मंत्री ठाकरे म्हणाले.यावेळी लग्नात होणा-या गर्दीवरूनही त्यांनी नाराजी व्यक्त केली.जर नियम मोडलेले दिसले तर हॉलच्या मालकावर गुन्हा दाखल होणार असल्याचे त्यांनी सांगितले. मास्क नाही वापरला तर दंड आकारला जाणार असेही त्यांनी सांगितले.
मास्क घालायला विसरलो तर हा छुपा शत्रू आपल्यावर वार करु शकतो. मास्क घालणे अनिवार्य आहे, लस घेतल्यानंतर सुद्धा तो वापरला पाहिजे,कोरोना आता पुन्हा डोकं वर काढतो आहे. आपण थोडं फिरायला लागलो. लग्नावरची बंधनं अजूनही आहेत असे सांगतानाच,हे उघडा ते उघडा म्हणणारे कोरोनाची शिस्त नाही मोडू शकत असे सांगत त्यांनी विरोधकांनाही टोला लगावला. कोरोना आता हळूहळू कोरोना हायपाय पसरायला लागला. आता दिलासादायक एवढच की आता लस उपलब्घ आहे. आतापर्यंत महाराष्ट्रात ९ लाख कोरोना योद्ध्यांना लस दिली गेली आहे. रोगापेक्षा इलाज भयंकर होतोय का अशी भीती आहे. पण ज्या 9 लाख लोकांना लस दिली त्यांच्यात घातक असे साईड इफेक्ट नाहीत असे सांगून कोरोना योद्ध्यांनी बेधडक लसीकरण करुन घेण्याचे आवाहन त्यांनी केले. कोणत्या राज्याला किती लस द्यायच्या हे केंद्र सरकार ठरवित आहे. आणखी काही कंपन्यांच्या लस येतील त्यांवेळी सर्वसामान्यांना लस उपलब्ध होईल असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.