अकोला – कोरोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शासनाच्या मार्गदर्शक सुचना व विभागीय आयुक्तांनी आज जारी केलेल्या आदेशानुसार अकोला महानगरपालिका आणि मुर्तिजापूर व अकोट नगर परिषदेचे संपूर्ण क्षेत्र प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून घोषित करीत निर्बंध जारी करीत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज निर्गमित केले.
हे आदेश मंगळवार दि. २३ फेब्रुवारीच्या सकाळी सहा वाजेपासून ते सोमवार दि. १ मार्च २०२१ च्या सकाळी आठवाजेपर्यंत लागू राहतील, असेही आदेशात स्पष्ट म्हटले आहे.
प्रतिबंधात्मक क्षेत्रासाठी निर्बंध लागू:
या आदेशात नमुद केल्यानुसार, घोषित केलेल्या प्रतिबंधात्मक क्षेत्रातील सर्व प्रकारची जीवनावश्यक दुकाने, किराणा, औषधी दुकाने, स्वस्त धान्य दुकाने ही सकाळी आठ ते दुपारी तीन वाजेपर्यंत सुरू राहतील. सर्व प्रकारची बिगर आवश्यक दुकाने, आस्थापना बंद राहतील. महानगरपालिका, नगरपरिषद, नगरपालिका क्षेत्रातील जे उद्योग सुरू ठेवण्याची परवानगी यापूर्वीच देण्यात आली आहे, ते उद्योग नियमितपणे सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. सर्व प्रकारची शासकीय कार्यालये आणि बँका(अत्यावश्यक सेवतील कर्मचारी आरोग्य व वैद्यकीय, कोषागार, आपत्ती व्यवस्थापन, पोलीस, NIC. अन्न व नागरी पुरवठा, FCI, N.Y.K.. महानगरपालीका, बँकसेवा वगळून) १५ टक्के किंवा १५ व्यक्ती यापैकी जी संख्या जास्त असेल, ती ग्राह्य धरून सुरू ठेवण्यात येतील. ग्राहकांनी शक्यतो दूरचा प्रवास करून खरेदी करणे टाळावे. सर्व प्रकारची उपहारगृहे, हॉटेल्स प्रत्यक्ष सुरू न ठेवता फक्त पार्सल सुविधा देण्यास परवानगी राहील. लग्न समारंभाकरिता पंचवीस व्यक्तींना(वधू व वरासह) तहसिलदारांकडुन परवानगी अनुज्ञेय राहील. सर्व प्रकारची शैक्षणिक कार्यालय (विद्यापीठ, महाविद्यालय, शाळा) येथील अशैक्षणिक कर्मचारी, संशोधन कर्मचारी, वैज्ञानिक यांना ई माहिती, उत्तरपत्रिका तपासणे, निकाल घोषित करणे इत्यादी कामांकरिता परवानगी राहील.
मालवाहतूक नेहमीप्रमाणे सुरू राहील आणि वाहतुकीसाठी कुठल्याही प्रकारचे निर्बंध राहणार नाहीत. सर्व प्रकारची सार्वजनिक व खाजगी वाहतूक अतिआवश्यक कामासाठी संबंधित क्षेत्रातील पोलीस निरीक्षक यांची पूर्वपरवानगी घेऊन परवानगी राहील.
भाजी मंडई सकाळी तीन ते सहा या कालावधीत सुरू राहील. मंडईमध्ये किरकोळ विक्रेते यांनाच प्रवेश राहिल. संपूर्ण अकोला जिल्ह्यातील प्रतिबंधात्मक क्षेत्रासाठी संचारबंदीच्या कालावधीत सर्व प्रकारच्या शाळा, महाविद्यालय, शैक्षणिक प्रशिक्षण केंद्रे, खाजगी शिकवणी वर्ग, कोचिंग क्लासेस बंद राहतील. संपूर्ण अकोला जिल्ह्यातील प्रतिबंधात्मक क्षेत्रासाठी ग्रामीण व शहरी भागांमध्ये संचारबंदीच्या कालावधीत सर्व प्रकारची सिनेमागृहे, व्यायामशाळा, जलतरण तलाव, मनोरंजन, उद्याने, नाट्यगृहे, प्रेक्षकगृहे व इतर संबंधित ठिकाणे बंद राहतील. संपूर्ण अकोला जिल्ह्यातील प्रतिबंधात्मक क्षेत्रासाठी ग्रामीण व शहरी भागांमध्ये संचारबंदीच्या कालावधीत सर्व प्रकारची सामाजिक, राजकीय, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम व इतर स्नेहसंमेलने या कालावधीत बंद राहतील. प्रतिबंधित क्षेत्रातील सर्व धार्मिक स्थळे नागरिकांसाठी पूर्णपणे बंद राहतील.
हे प्रतिबंधात्मक क्षेत्रासाठीचे आदेश मंगळवार दि. २३ फेब्रुवारीच्या सकाळी सहा वाजेपासून ते सोमवार दि. १ मार्च २०२१ च्या सकाळी आठवाजेपर्यंत लागू राहतील. आदेशाचा भंग करणाऱ्यावर व्यक्तीवर दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल. अशा व्यक्ती, संस्था, संघटना यांचेवर गुन्हे दाखल करण्यासाठी संबंधित पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरिक्षक दर्जापेक्षा कमी नाही अशा अधिकाऱ्यांना अधिकार बहाल करण्यात आले असल्याचेही जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आदेशाव्दारे कळविले आहे.