अमरावती : शहरातल्या जमील कॉलनी परिसरात बुधवारी रात्री पावणे बारा वाजताच्या सुमारास चारचाकी वाहनाने आलेल्या व्यक्तींनी गोळीबार केला. यात एक व्यक्ती जखमी झाला आहे. फिरोज उर्फ नच्छु रा. अलहिलाल कॉलनी, असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. त्याच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालय उपचार सुरू आहे. फिरोज हा जमील कॉलनी जवळच्या बेस्ट रुग्णालय जवळ उभा होता. त्याचवेळी एका कारमधून तीन ते चार व्यक्ती तेथे आले. त्यापैकी एकाने खाली उतरून देशी बंदुकीने हवेत गोळीबार केला.
हा प्रकार लक्षात येताच फिरोज तेथून पळत असतानाच त्याच्यावरही हल्लेखोराने गोळी झाडली. ती त्यांच्या छातीला लागली. त्यानंतर हल्लेखोर पळून गेले. घटना लक्षात येताच आजूबाजूचे धावले. जखमीला रुग्णालयात हलविण्यात आले. घटनेची माहिती मिळताच नागपुरी गेट पोलिस घटनास्थळी पोहचले. त्यांनी हल्लेखोरांचा शोध सुरू केला आहे. एका माहितीनुसार, फिरोजचे बुधवारी सायंकाळी काही युवकांसोबत भांडण झाले होते. त्यावेळी शस्त्रेही बाहेर निघाली होती. त्या भांडणातूनच रात्री गोळीबार झाल्याचा संशय पोलिसांना आहे.