अकोला – असंघटीत कामगारांकरीता प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना व लघु व्यापाऱ्यांकरीता राष्ट्रीय निवृत्ती योजना शासनाने लागू केल्या आहे. त्याअनुषंगाने आज जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली या योजनांच्या अंमलबजावणीच्या जिल्हास्तरीय समितीची आढावा घेण्यात आली. या योजनांचा लाभ जिल्ह्यातील लघु व्यापारी व असंघटीत क्षेत्रातील कामगारांनी घ्यावा,असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले. तसेच या योजनांची माहिती पोहोचविण्यासाठी जनजागृती अभियान राबवावे,असे निर्देश दिले.
प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना व राष्ट्रीय निवृत्ती योजनाचा जिल्हास्तरीय अंमलबजावणी समितीची बैठक आज पार पडली. याबैठकीस सहाय्यक कामगार आयुक्त राजू गुल्हाने, शासकीय कामगार अधिकारी गौरव नालिंदे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अनंत गणोरकर, समाज कल्याण विभागाचे आर.एस. वसतकार, महिला व बाल विकास विभागाचे परिविक्षा अधिकारी ए.बी. वेरुळकर आदी उपस्थित होते.
यावेळी असंघटीत क्षेत्रामध्ये काम करणारे ऑटो चालक, विटभट्टीवर काम करणारे, विविध व्यवसायात, बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांना योजनेची माहिती द्यावी. त्याचा लाभ घेण्याकरीता आवाहन करावे. तसेच विटभट्टी, हॉटेल, बांधकाम अशा ठिकाणी बाल कामगार आढळून आल्यास संबंधित व्यावसायिकांवर बाल मजुरी प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई. करण्याचे निर्देश दिले. यासंदर्भात अधिक माहिती साठी कामगार विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले.