मुंबई : मुंबईत एका 26 वर्षीय डॉक्टरने आत्महत्या केली आहे. नायर रुग्णालयात काल रात्री ही घटना घडली आग्रिपाडा पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. या डॉक्टरने आत्महत्या का केली याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
मृत डॉक्टरचं नाव डॉ. तुपे असल्याची माहिती आहे. ते नायर रुग्णालयात पदव्युत्तर शिक्षणाचे विद्यार्थी होते. काल रात्री त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती आहे. त्यांच्या खोलीत त्यांचा मृतदेह आढळून आला.
हा तरुण डॉक्टर नायर रुग्णालयात एनस्थेशिया म्हणजेच भूल देणारा डॉक्टर होता. काही दिवसांपूर्वी त्यांच्या वडिलांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं होतं. वडिलांवर अंत्यसंस्कार केल्यानंतर डॉ. तुपे नायर रुग्णालयात परतले. काल दिवसभर त्यांनी रुग्णालयात नेहमीप्रमाणे काम केलं.
रात्री झोपण्यापूर्वी त्यांनी काही औषधी घेतल्या. त्या औषधांचा ओव्हर डोज झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तो ज्या खोलीत झोपतो, ती खोली सकाळी बऱ्याच वेळेपर्यंत बंद होता. खोलीचं दार ठोठावूनही आतून काहीही उत्तर आलं नाही. त्यामुळे काही जणांनी मिळून खोलीचं दार उघडलं. तेव्हा डॉक्टर तुपे हे मृतावस्थेत आढळून आले, अशी माहिती नायर रुग्णालयाचे डीन भारमल यांनी दिली.
त्यानंतर पोलिसांना याची माहिती देण्यात आली. पोलिसांनी पंचनामा करुन त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. याप्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत. मात्र, या डॉक्टरने आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल का उचललं याबाबत अद्याप काहीही माहिती नाही.