अकोला : संयुक्त किसान मोर्चा देशातील विविध भागात जाऊन किसान महापंचायतद्वारे कायद्याचा विरोध गाव पातळीपर्यंत पोहचविण्याकरिता प्रयत्नरत आहे. या प्रक्रियेतला भाग म्हणून, संयुक्त किसान मोर्चाची ‘किसान कैफीयत’ ही महापंचायत २० फेब्रुवारी रोजी अकोल्यात शेतकरी नेते राकेश टीकैत व युद्धविर सिंह यांच्या उपस्थित होत आहे.
शासकीय विश्राम गृह येथे शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत शेतकरी जागर मंचच्या वतीने याबाबत माहिती देण्यात आली. महाराष्ट्रातील ही पहिलीच किसान महापंचायत आहे. केंद्र सरकार दडपशाहीच्या मार्गाने शेतकरी विरोधी कायदे शेतकऱ्यांवर लादण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे देशभरातील शेतकरी समाजामध्ये मोठी अस्वस्थता निर्माण झाली आहे. दिल्लीच्या सिमेवर आंदोलन ही शेतकरी समाजासाठी एखादी दुसरी घटना नसून त्यांच्या स्वातंत्र्याच्या लढाईतील एक महत्त्वाचा टप्पा आहे. म्हणूनच देहभान विसरून लाखो शेतकरी आंदोलनात ठिया देऊन बसले आहेत. राकेश टीकैत यांची अकोल्यातील सभा ही महाराष्ट्रातील शेतकरी चळवळीला नवी आयाम देणारी असेल, अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.
सभेत यांचा सहभाग
किसान कैफीयत महापंचायतीचे आयोजन अकोल्यातील खुले नाट्यगृह येथे २० फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजता करण्यात आले आहे. या सभेत स्वाभीमानी शेतकरी संघटना, किसान विकास मंच, कुणबी विकास मंडळ, नेहरू युवा परिवार, अमरावती विभागीय शिक्षक संघ, मराठा सेवा संघ, देशमुख समाज मंडळ, अखिल भारतीय मराठा महासंघ व इतर अनेक संघटनांचा आयोजन व नियोजनात सक्रिय सहभाग राहणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.