अकोला – दि. अकोला अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि. अकोला व केंद्रीय सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालय भारत सरकार यांच्या सह्योगाने आज शुभमंगल सभागृहात ग्राहक मेळावा व उद्योजकता कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. ग्रामीण व शहरी क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या सहकारी बँकांनीही नवंउद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी शासनाच्या योजना राबवून भारताला आत्मनिर्भर बनविण्याचे आवाहन सूक्ष्म,लघु व मध्यम उद्योग विभागाचे संचालक प्रमोद पार्लेवार यांनी केले.
यावेळी विधान परिषदेचे सदस्य डॉ. रामदासजी आंबटकर, रणजीत पाटील, आमदार गोवर्धन शर्मा, हरिष पिंपळे, महापौर अर्चनाताई मसने, अकोला अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष रामेश्वर फुंडकर, उपाध्यक्ष शंतनु जोशी, अर्बन बँकेचे संचालक व सदस्य उपस्थित होते.
उद्योजकता कार्यशाळेत ग्राहक व नवउद्योजकताना प्र.म. पार्लेवार यांनी मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी सुक्ष्म,लघु व मध्यम विभागाच्या योजनांचे कार्य कसे चालते, नोंदणी कशी करावी, निधी कसा मिळवावा आदींची माहिती दिली. तर कन्सल्टन्सी, क्रेडिट गॅरंटी फंड ट्रस्ट, प्रधानमंत्री रोजगार सृजन कार्यक्रम, मुद्रा लोन, अभियांत्रिकी विद्यार्थ्यांच्या नवकल्पनांना आकार देण्यासाठी बिझनेस इन्क्यूबेल्ट, आत्मनिर्भर भारत अभियान, क्लस्टर विकास योजना आदींची माहिती दिली. आत्मनिर्भर भारत निर्मितीसाठी शासनाने लघु व मध्यम उद्योगासाठी भरघोष आर्थिक पॅकेज जाहिर केले आहे. त्याचा लाभ घेण्यासाठी नवउद्योजकांनी पुढे येण्याचे आवाहन पार्लेवार यांनी केले. तसेच त्यानी पॉवर प्रेझेन्टेश व चित्रफितद्वारे योजनांची माहिती दिली.
कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार रामदासजी आंबटकर यांनी केले. प्रस्तावना बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजन सोनटक्के यांनी केले. तर सुत्र संचालन आनंद दशपूते व आभार उपाध्यक्ष शंतनू जोशी यांनी मानलेत.