अकोला – राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायत सार्वत्रिक तसेच रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांकरीता पारंपारीक पध्दतीने राबविण्यात यावयाचा मतदार यादीचा कार्यक्रम घोषित केला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील सार्वत्रिक तसेच रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांकरिता मतदार यादीचा कार्यक्रम प्रभाग निहाय प्रारुप मतदार यादी जाहिर करण्यात आली आहे. त्यात तेल्हारा तालुक्यातील आठ, अकोट येथील 11, मुर्तिजापूर येथील 49, अकोला येथील 13, बाळापूर येथील 18, बार्शिटाकळी येथील 28 तर पातुर येथील 21 असे एकूण 148 ग्रामपंचायतीच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुक जाहिर करण्यात आले आहे.
मतदार यादी कार्यक्रमानुसार प्रभाग निहाय प्रारुप मतदार यादीवर आक्षेप व हरकती असल्यास संबंधीत तहसील कार्यालयात मंगळवार (दि. 16) पर्यंत स्विकारण्यात येतील. त्यानंतर प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी गुरुवार दि. 18 फेब्रुवारी रोजी प्रसिध्द करण्यात येईल, असे ग्रामपंचायत व जिल्हा परिषद निवडणूक विभागाचे उपजिल्हाधिकारी तथा प्रभारी अधिकारी संजय खडसे यांनी कळविले आहे.