पातूर (सुनिल गाडगे)- अकोला जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्या दहशतवाद विरोधी पथकाने पातूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असलेल्या बाभूळगाव येथे अहमदाबाद गुजरात येथून अवैध गुटखा घेऊन जाणाऱ्या ट्रकला पकडून मुद्देमाल जप्त करून एकास अटक केली. पोलिस सूत्रांनी दिलेल्या अधिकृत माहितीनुसार जिल्हा पोलिस अधिक्षक यांच्या दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख पोलिस निरीक्षक विलास पाटील यांना अहमदाबाद गुजरात वरून एक ट्रक क्रमांक GJ 27 X 6922 हा गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ घेऊन येत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार पातूर पोलिस स्टेशनच्या हद्दीत येत असलेल्या बाभूळगाव येथे सदर ट्रकला थांबवून पंचांसमक्ष तपासणी केली असता त्यामध्ये महाराष्ट्र सरकारने प्रतिबंधित केलेला 10 लाख रुपये किंमतीचा गुटखा,सुगंधित तंबाखू, प्लॅस्टिक बॅग व तंबाखूजन्य पदार्थ तसेच 1 ट्रक किंमत दहा लाख असे मिळून एकूण 20 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून आरोपी ट्रकचालक शब्बीर मियाँ कालु मियाँ मलीक (वय 28) रा.नयनपुर(अहमदाबाद) जिल्हा खेडा,गुजरात यास अटक केली असून त्याविरोधात पातूर पोलिस स्टेशनमध्ये महाराष्ट्र सरकारने प्रतिबंधित केलेल्या वस्तू बाळगणे वाहतूक करणेनुसार कारवाई करून सदर मुद्देमाल व आरोपीस पातूर पोलिसांच्या स्वाधीन केले. सदर कारवाई अकोला जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्या दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख पोलीस निरीक्षक विलास पाटील यांच्या मार्गदर्शनात त्यांच्या चमूने केली असून वृत्त लिहेस्तोवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील कारवाई पातूर पोलीस करीत आहेत