हिवरखेड(धीरज बजाज)-विदर्भातील सर्वात मोठी ग्रामपंचायत हिवरखेड निवडणुकीत निवडून आलेल्या सतरा सदस्यां मधून सरपंच आणि उपसरपंच निवडीची पहिली सभा दिनांक 11 फेब्रुवारी रोजी ग्रामपंचायत कार्यालयात पार पडली. 17 सदस्य ग्रामपंचायत मध्ये कोणत्याच गटांना स्पष्ट बहुमत नसल्याने कोणाचा सरपंच आणि उपसरपंच होतो याकडे संपूर्ण अकोला जिल्ह्यातील जनतेचे लक्ष लागलेले होते. पर्यंत प्रहार आणि ग्रामविकास पॅनलने सोबत येऊन सत्ता काबीज केली.
सरपंच पदासाठी सौ. सीमाताई संतोष राऊत, सौ सुनंदाताई सुरेश गिऱ्हे आणि कु. आचल सुरेश ओंकारे, या तिघांनी नामांकन अर्ज दाखल केले होते त्यापैकी सौ सुनंदाताई गिऱ्हे यांनी आपला नामांकन अर्ज मागे घेतला. त्यामुळे सौ सीमा राऊत आणि कु आचल ओंकारे यांच्यात थेट लढत झाली. तर उपसरपंच पदासाठी रमेश दुतोंडे आणि सुनील इंगळे यांच्यात लढत झाली. या लढतीमध्ये सरपंचपदी प्रहारच्या सौ सीमा संतोष राऊत यांचा विजय झाला तर उपसरपंचपदी भाजपाचे वरिष्ठ नेते, ग्राम विकास पॅनलचे रमेश दुतोंडे यांचा विजय झाला.
प्रहार चे बच्चुभाऊ कडू पालकमंत्री पदी विराजमान असल्याने त्यांचा सरपंच आणि भाजपचे आमदार विकास महर्षी प्रकाश भारसाकळे यांचे निकटवर्तीय आणि भाजपच्या जिल्हा परिषद सदस्या सौ सुलभाताई दुतोंडे ह्यांचे पती रमेश दुतोंडे उपसरपंच बनल्याने प्रहार आणि भाजपच्या डबल इंजिनमुळे हिवरखेड च्या विकासाला गती मिळेल अशी अपेक्षा हिवरखेड चे नागरिक व्यक्त करीत आहेत.