अकोला – गावातल्या गावकऱ्यांनी आपापसातले मतभेद विसरुन गावाच्या समृद्धीसाठी एकत्र येऊन गावाचा शाश्वत विकासात आपले योगदान द्यावे असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज येथे केले.
पानी फाऊंडेशनच्या वतीने आयोजित समृद्ध गाव स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत जिल्ह्यातील बार्शी टाकळी व अकोट या तालुक्यातील ७७ गावे सहभागी झाली आहेत. त्याअनुषंगाने येथील जिल्हाधिकारी कार्यालयात नियोजन सभागृहात आज तहसिलदार, गटविकास अधिकारी, ग्रामसेवक, तलाठी, सरपंच, कृषि सहाय्यक आदींचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. यावेळी विधानसभा सदस्य आ. हरिष पिंपळे, उपजिल्हाधिकारी रोहयो बाबासाहेब गाढवे, उपविभागीय अधिकारी अकोट एस.एस. देशपांडे, पानी फाऊंडेशनचे प्रमुख मार्गदर्शक नामदेव नन्नावरे, विभागीय समन्वयक सुभाष नानावटे, तालुका समन्वयक संघपाल वाहुरवाघ, कनिष्ठ अभियंता रोहयो गूंज राठोड आदी उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांना गावातील विहिर पाणी पातळी मोजमाप, जलव्यवस्थापन , कुटुंबनिहाय उत्पन्न वाढ, मृदा व जलसंधारण, पौष्टिक गवताचे कुरण तयार करणे, वृक्ष व जंगल लागवड, मातीचे आरोग्य या व अशा विविध बाबींविषयी माहिती देण्यात आली.
गावाच्या विकासासाठी पानी फाऊंडेशनने आयोजित केलेल्या स्पर्धेचे विविध निकष पुर्ण करण्यासाठी गावातील गावकऱ्यांनी एकत्रित येऊन काम करणे आवश्यक आहे. गावाने एकी केली तर नक्कीच गावाचा विकास होतो. गावात एकोपा निर्माण होऊन गावासाठी काम केल्याने आपल्याला गावाचे ऋण फेडण्याची संधी मिळते. पाण्यासाठी काम करणे हे आपले राष्ट्र उभारणीचे काम आहे,अशा शब्दात आ. हरिष पिंपळे यांनी मार्गदर्शन केले.
या प्रशिक्षणाच्या यशस्वीतेसाठी महेंद्र दामोदर, विद्या अकोडे, मनिष महल्ले व अन्य कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.