एक एप्रिल 2020 पासून एकदाही वीज बिल न भरलेल्या ग्राहकांचा थकबाकीचा भरणा न केल्यास पुढील तीन आठवड्यांत वीजपुरवठा खंडित करण्याचे निर्देश महावितरणचे पुणे प्रादेशिक संचालक (प्रभारी) अंकुश नाळे यांनी दिले आहेत.
पश्चिम महाराष्ट्रातील घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वर्गवारीतील 14 लाख 29 हजार 811 ग्राहकांनी दहा महिन्यांत बिल भरले नसल्याचेही उघडकीस आले आहे. नुकत्याच झालेल्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंग बैठकीत त्यांनी या ग्राहकांची वीज कापण्याचा इशारा दिला आहे.
यावेळी पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता सचिन तालेवार यांच्यासह पाचही जिल्ह्यांतील अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. सद्यस्थितीत पुणे (1,032.80 कोटी), सातारा (140.36 कोटी), सोलापूर (259.12 कोटी), सांगली (192.54 कोटी) व कोल्हापूर (337.43 कोटी) थकबाकी आहे. ही एकूण रक्कम 1,962 कोटी 27 लाख इतकी आहे.
1,247 कोटी 49 लाख रुपयांची थकबाकी असणार्या 14 लाख 29 हजार 811 वीज ग्राहकांनी 1 एप्रिल 2020 पासून एकाही महिन्याचे वीज बिल भरलेले नाही. पश्चिम महाराष्ट्रात अशा घरगुती ग्राहकांची संख्या सर्वाधिक 12 लाख 68 हजार 487 आहे. त्यांच्याकडे 856 कोटी 81 लाख रुपयांची थकबाकी आहे. तर 1 लाख 38 हजार 870 वाणिज्यिक ग्राहकांकडे 264 कोटी 32 लाख आणि 22 हजार 454 औद्योगिक ग्राहकांकडे 126 कोटी 35 लाखांची थकबाकी आहे.