नवी दिल्ली : नोकरदार वर्गाला केंद्र सरकारकडून लवकरच ‘गुड न्यूज’ मिळू शकते. आठवड्यातून 48 तास काम केल्यानंतर तीन दिवस कर्मचाऱ्यांना सुट्टी देण्याचा पर्यायावर केंद्र सरकार विचार करीत असल्याची माहिती समोर आली आहे. काही वृत्तसंस्थांनी कामगार सचिव अपूर्वा चंद्रा यांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे. या अनुषंगाने लेबर कोडमध्ये नवीन नियमावली समाविष्ट केली जाऊ शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे. विशेष म्हणजे आयटी तसेच शेयर्ड सर्व्हिसेजसारख्या क्षेत्राला याचा सर्वाधिक लाभ होईल, असे समजते. परंतु, सरकारकडून या संदर्भात प्राथमिक पातळीवर विचार सुरु असल्याचे बोलले जात आहे.
काही प्रसारमाध्यमांना चंद्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार आठवड्यात 48 तास काम करण्याचा नियम कायम असेल. परंतु, कंपन्यांना तीन शिफ्टमध्ये काम करण्यास मंजुरी दिली जाऊ शकते. 12 तासांची शिफ्ट करणाऱ्या कर्मचाऱ्याला 4 दिवस काम करावे लागेल. याप्रकारे 10 तास काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला 5 दिवस आणि 8 तास काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला 6 दिवस काम करावे लागेल.
तीन शिफ्टबाबात कर्मचारी किंवा कंपन्यांवर कोणताच दबाव टाकला जाणार नाही, असेही चंद्रा यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे. परंतु, यात थोडी लवचिकता दिली जाईल. कामाच्या बदलत्या पद्धतीमुळे हे बदल करण्याचा मानस केंद्राचा आहे. ही तरतूद लेबर कोडचा भाग असेल. नियम लागू झाल्यानंतर कंपन्यांना चार किंवा पाच दिवसांच्या वर्क कल्चरसाठी सरकारची परवानगी घ्यावी लागेल हे विशेष.
कंपन्यांना नवीन आठवडा सुरू करण्यापूर्वी कर्मचाऱ्यांना सुट्टी द्यावी लागेल. कंपन्यांनी चार दिवसांचा आठवडा दिला, तर तीन दिवस सुट्टी द्यावी लागेल. पाच दिवस काम करुन घेतल्यास दोन दिवस सुट्टी द्यावी लागेल, असे ही चंद्रा यांनी स्पष्ट केले.