नवी दिल्ली : केंद्रीय अर्थसंकल्पात सोने आयात शुल्कात कपात करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर सोन्याचे दर गेल्या चार दिवसांत दोन हजार रुपयांनी घसरले आहेत. सोन्याबरोबर चांदी दरातही गुरुवारी मोठी घट नोंदविण्यात आली. मल्टी कमॉडिटी एक्स्चेंज अर्थात एमसीएक्समध्ये सोन्याचे तोळ्याचे (प्रति 10 ग्रॅम) दर 47 हजार 550 रुपयांपर्यंत खाली आले आहेत. दुसरीकडे चांदीचे प्रतिकिलोचे दर 68 हजार 356 रुपयांपर्यंत खाली आले आहेत.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवारी अर्थसंकल्प सादर केला, त्यावेळी सोन्याच्या आयात शुल्कात कपात केली होती. तेव्हापासून असलेली घसरण थांबलेली नाही. चार दिवसांत सोन्याचे दर दोन हजार रुपयांनी कमी झाले आहेत. चांदी दरातही 3 हजार रुपयांपेक्षा जास्त घसरण झाली आहे. जागतिक बाजारातही सोन्या-चांदीचे दर घटले आहेत. यामुळेही दर कमी होण्यास मदत मिळाली असल्याचे सराफ बाजारातील तज्ज्ञांकडून सांगितले जात आहे.