लखनऊ : उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाऊ प्रल्हाद मोदी बुधवारी (दि. ३) आपल्या सहकाऱ्यांच्या अटकेच्या निषेधार्थ विमान तळावरच धरणे आंदोलन करत ठिय्या मारला. प्रल्हाद मोदी यांनी लखनऊ पोलिसांच्या कार्यशैलीवर टीका करत त्यांच्या विरोधात आंदोलन सुरु केले. तसेच जर त्वरीत त्यांच्या सहकाऱ्यांना सोडले नाही तर आपण उपोषणास बसू असा इशाराही यावेळी त्यांनी प्रशासनाला दिला.
प्रल्हाद मोदींचे ४ फेब्रुवारी रोजी सुलतानपूर तर ५ फेब्रुवारी रोजी जौनपूर येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. यासाठी प्रल्हाद मोदी हे लखनऊ विमानतळावर बुधवारी दाखल झाले. त्यांच्या स्वागतासाठी १०० हून अधिक कार्यकर्ते विमानतळावर येणार होते. पण, लखनऊ पोलिसांनी त्या सर्वांना ताब्यात घेत पोलिस ठाण्यातच बसवून ठेवले. पोलिसांच्या या कार्यपद्धतीचा निषेध करत आपल्या सहकाऱ्यांना सोडण्यात यावे यासाठी प्रल्हाद मोदी यांनी विमानतळावरच धरणे आंदोलन सुरु केले. शिवाय जो पर्यंत आपल्या सहकार्यांना सोडण्यात येत नाही तोपर्यंत आपण उपोषण करणार असल्याचे सांगितले.
यावेळी प्रल्हाद मादी यांनी पोलिसांना कोणाच्या आदेशाने ही कारवाई करण्यात आली याचा जाब विचारला. जर ही कारवाई पीएम ऑफिस यांच्या आदेशावरुन करण्यात आली आहे तर तसा आदेश आपणास दाखवावा अशी विचारणा पोलिसांना केली. जर पोलिसांनी तसे आदेश दाखवले नाही तर यांचा लाभ कोणालाच होणार नाही, उलट याचा तोटा येथील सरकारला आणि पीएमओ कार्यालयालाच होईल असा टोला ही त्यांनी यावेळी लगावला.
आपल्या सहकार्याविराधात जी कारवाई करण्यात आली आहे तिचे आदेश जो पर्यंत दाखवत नाहीत किंवा आपल्या सहकार्याना जोपर्यंत सोडून देण्यात येत नाही तोपर्यंत आपण विमानतळावरील धरणे आंदोलन चालू ठेवणार असल्याचे प्रल्हाद मोदी यांनी सांगितले. शिवाय आपण अन्न व पाणी त्याग करुण उपोषणास बसू असा इशारा ही दिला आहे.