अकोली जहाँगिर: अकोली जहाँगिर येथे चारित्र्यावर संशय व्यक्त करीत, पतीने दोराने गळा आवळून पत्नीची निर्घुण हत्त्या केल्याची घटना मंगळवारी पहाटे घडली. याप्रकरणी अकोट ग्रामीण पोलिसांनी पतीविरूद्ध गुन्हा दाखल केला. हत्त्या केल्यानंतर पती घटनास्थळावरून फरार झाला.
अकोली जहॉंगिर येथील निर्मला अशोक सोनवणे(५५) या महिलेच्या चारित्र्यावर पती अशोक सोनवणे हा नेहमीच संशय घ्यायचा. मंगळवारी पहाटे पती अशोक सोनवणे याने चारित्र्यावर संशय घेवून पत्नी निर्मला सोनवणे हिच्यासोबत वाद घातला. वाद विकोपाला पोहोचल्याने, संतापलेल्या पतीने पत्नीचा दोराने गळा आवळला. यातच निर्मला सोनवणे हिचा जागीच मृत्यू झाला. पती हा घटनास्थळावरून फरार झाला, असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. निर्मला सोनवणे ही महिला पती अशोक नारायण सोनवणे याच्यापासून वेगळी राहत होती. अशोक सोनवणे हा बीड जिल्ह्यात वीट भट्टीवर मजुरी करीत होता. घटनेच्या रात्रीच तो गावात आला होता. पत्नीशी वाद करून त्याने तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा दोराने गळा आवळून हत्या केली आणि फरार झाला. त्यांना दोन मुले व एक मुलगी आहे. मुलगी विवाहित आहे. दोन्ही मुले कामानिमित्ताने बाहेरगावी राहतात. घटनास्थळी प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष राऊत, अकोट शहरचे ठाणेदार संतोष महल्ले, अकोट ग्रामीण ठाणेदार ज्ञानोबा फड यांनी भेट दिली. हत्याकांडाचा तपास पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली अकोट ग्रामीण ठाणेदार ज्ञानोबा फड, पोलीस उपनिरीक्षक अनुराधा पाटखेडे, धर्माजी डाखोरे,असलम खान पठाण सह अकोट ग्रामीण पोलीस करीत आहेत.