अकोला : जिल्ह्यात पल्स पोलिओ लसीकरण मोहीम ३१ जानेवारीला राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील १ लाख ८५ हजार ९०९ लाभार्थी बालकांना लस देण्याचे नियोजन आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.
यावेळी कोरोनाच्या अनुषंगाने शासनाने घालून दिलेल्या सर्व नियमांचे पालन करीत पालकांनी आपल्या ५ वर्षांखालील बालकांना पोलिओ लसीकरण बूथवर न्यावयाचे आहे. यावेळी अतिरिक्त डोस मिळणार नसल्याने पालकांनी यासंदर्भात हयगय करू नये, असे आवाहनही आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.
दरम्यान, यादिवशी काही कारणाने बूथवर येणे शक्य न झाल्यास अशा बालकांसाठी ग्रामीण भागात ३ दिवस आणि शहरी भागात ५ दिवस आरोग्य पथक घरोघरी जावून पोलिओ लसीकरण करणार आहे.
मोबाईल टीमद्वारे लसीकरण
रेल्वेस्थानक, बसस्थानक अशा ठिकाणी आरोग्यपथके तैनात करून प्रवासात असलेल्या बालकांना ३१ जानेवारीला पोलिओचा डोस देण्यात येईल. तसेच वीटभट्टी, बांधकामाच्या ठिकाणी आणि भटक्या जमातीतील लोकांच्या बालकांना मोबाईल टीमच्या माध्यमातून पोलिओ लसीकरण केले जाणार आहे.
१ हजार ४०१ बूथची स्थापना
जिल्ह्यात पोलिओचे १ लाख ८५ हजार ९०९ लाभार्थी आहेत. त्यापैकी ९६ हजार ४३५ लाभार्थी हे ग्रामीण भागातील, ३० हजार १७६ लाभार्थी शहरी भागातील आणि ५९ हजार २९८ लाभार्थी हे महानगरपालिका क्षेत्रातील आहेत. या लसीकरणासाठी जिल्ह्यात एकूण १ हजार ४०१ बूथची स्थापना करण्यात आली असून, त्यावर २८३ बूथ पर्यवेक्षक आणि जिल्ह्यात ९० मोबाईल टीम सज्ज करण्यात आल्या आहेत. गृहभेटींकरिता एकूण २ हजार ६१ टीम तयार करण्यात आल्या आहेत. ट्रान्झीट टीमची संख्या २४७ आहे.