फोंडा : ओढणी बांधून तयार केलेल्या झोपाळ्यावर झुलताना ओढणी गळ्याभोवती आवळल्याने सात वर्षीय रंजना चव्हाण या बालिकेचा बळी गेला. नागझर-कुर्टी येथील हौसिंग बोर्ड परिसरात ही घटना बुधवारी घडली.
झोपाळ्यावर झोके घेणार्या लहान बालिकेच्या गळ्याभोवती ओढणीचा फास आवळला गेला. त्यातून सुटण्यासाठी तिने धडपड केली आणि ती जमिनीवर पडून बेशुद्ध झाली. हा प्रकार घडला तेव्हा या बालिकेची मोठी बहीण घरात कामात व्यग्र होती. छोटी मुलगी बेशुद्ध पडल्याचे शेजारीच राहणार्या महिलेच्या लक्षात आले. तिने त्वरित त्या बालिकेला दवाखान्यात नेले असता, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.