नागपूर : विदर्भातील अमरावती जिल्ह्यात परतवाडा येथे माझं आजोळ होतं. माझी आजी ही परतवाडा येथील आहे. आमच्या धमन्यांमध्येही विदर्भाचे रक्त आहे त्यामुळे “विदर्भाचे प्रेम” आम्हाला कोणी शिकवण्याची गरज नाही, असा टोला राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज विरोधकांना लगावला. नागपुरात आणि विदर्भात जे जे काही करता येणे शक्य असेल ते सर्व आम्ही करू असं आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिले. नागपुरातील बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा प्राणी संग्रहालय आणि उद्यानाचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते मंगळवारी (दि. २६) लोकार्पण झाले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी गृहमंत्री अनिल देशमुख, वनमंत्री संजय राठोड, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, नागपुरचे पालकमंत्री नितीन राऊत, पशुसंवर्धन मंत्री सुनिल केदार यांच्यासह वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि आमदार उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले की जगायचे असेल तर वाघासारखे जगायचे आणि त्यादृष्टीनेच साजेसं काम विदर्भात करायचे आहे. महाविकास आघाडी सरकारच्या वतीने एकत्रीत पणे पुढचे पाऊल आम्ही आत्मविश्वासाने टाकत आहे. विदर्भातील जनतेला विकासापासून दुर ठेवले जाते हा गैरसमज विदर्भाच्या जनतेमध्ये आहे. मात्र विकास कामे करून विदर्भाच्या जनतेच्या मनातील हा गैरसमज दुर करू असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. पुढील काही दिवसात गडचिरोली जिल्ह्य़ातील सुरजागड प्रकल्प मार्गी लावायचा प्रयत्न करू असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. गोरेवाडा प्राणी संग्रहालयाला च्या परिसरातच गोंडवाना थिम पार्क उभारणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी आवर्जून सांगितले. या थिम पार्क मध्ये आदिवासी समाजाची संस्कृती, परंपरा यांचे दर्शन घडविणाऱ्या एका गावाची निर्मिती करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
नागपूर ही वनराजधानी : आदित्य ठाकरे
गोरेवाडा प्राणी संग्रहालयाचे लोकार्पण झाल्यानंतर आता या ठिकाणी पर्यटक आणण्याची जबाबदारी आपल्याला सर्वानी मिळून घ्यावी लागेल असे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले. विदर्भातील वनक्षेत्र अतिशय समृध्द आहे. विपूल प्रमाणात वनसंपदा आहे. देशात जर वनराजधानी करायची असेल तर त्याची सुरूवात नागपुर पासून करावी लागेल असे आदित्य ठाकरे म्हणाले.
५६४ हेक्टर वर प्राणिसंग्रहालय आणि जंगल सफारी
प्रजासत्ताक दिनापासून नागपूर व विदर्भाच्या पर्यटनाला गती देणाऱ्या बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यानातील इंडियन सफारीला सुरुवात झाली आहे. ५६४ हेक्टरवर उभे असलेल्या या प्राणीसंग्रालयामुळे नागपूरच्या वैभवात भर पडली आहे.
नागपूर पासून जवळ असणाऱ्या गोरेवाडा परिसरात आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान उभे झाले आहे. २५ हेक्टर परिसराला उंचच्या उंच जाळीचे कुंपण आणि त्यामध्ये वेगवेगळ्या चार भागात वाघ, बिबट, अस्वल, आणि तृणभक्षी प्राणी आपल्या नैसर्गिक अधिवासात बाळगताना पाहणे हा एक सुखद अनुभव आहे. वाघ स्वतंत्ररित्या २५ हेक्टर परिसरात वावरतात, बिबट त्यांच्यासाठी तयार केलेल्या २५ हेक्टर परिसरात स्वतंत्रपणे वावर करतात, अस्वली स्वतंत्र परिसरात वावर करतात. तृणभक्षी प्राणी मात्र एकत्रित वावर करतात. जंगलामध्ये आपल्या विश्वात मोकळेपणे वावरताना प्राण्यांना बघणे या प्राणी संग्रहालयाचे वैशिष्ट्य आहे.
सध्या या चार ठिकाणी इंडियन सफारी अंतर्गत या प्राण्यांचे हमखास दर्शन होते. याच परिसरात प्राण्यांच्या खानपानाची, राहण्याची, त्यांची तपासणी करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या नैसर्गिक अधिवासात असणाऱ्या प्राणीसंग्रालयामध्ये अन्य ठिकाणच्या प्राण्यांना ठेवण्यात येते. ‘गोरेवाडाचा राजा’ म्हणून प्रसिद्ध झालेला वाघ २०१७ मध्ये भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथून स्थलांतरित झालेला आहे. तसेच महाराज बाग येथून प्राप्त ‘ली’ नावाची वाघीण देखील स्थलांतरित आहे.