राज्यात नोकरभरतीला सुरुवात झाली आहे. गृह विभागात ५ हजार २९७ पदांसाठी भरती केली जात आहे, अशी माहिती आज शनिवारी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. (Recruitment in Home Department Maharashtra)
आरोग्य आणि गृह खात्यांमध्ये मिळून १३, ८०० पदांची पहिल्या टप्प्यात भरती केली जात आहे. तर दुसऱ्या टप्प्यात ७ हजार २३१ पदांची भरती केली जाणार आहे. ही भरती प्रक्रिया लवकर पूर्ण होईल, असे देशमुख यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
कोरोनामुळे राज्यातील भरती प्रक्रिया रखडली होती. यामुळे अनेक बेरोजगार तरुण नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत. पण आता राज्यात नोकरभरतीला सुरुवात झाली असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी जाहीर केले आहे.
दरम्यान, भारतात पहिल्यांदाच कारागृह पर्यटनाला सुरूवात केली जाणार आहे. महाराष्ट्राच्या पुणे येथील येरवडा तुरूंगात कारागृह पर्यटनाला सुरूवात केली जाणार असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज नागपुरात दिली.
देशात पहिल्यांदाच जेल पर्यटनाची संकल्पना महाराष्ट्रात अंमलात आणण्यात येणार असून येरवडा जेलमधून २६ जानेवारीपासून याची सुरुवात होणार आहे, असे अनिल देशमुख यांनी सांगितले. येत्या २६ जानेवारीला राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते येरवडा येथे कारागृह पर्यटनाचे उदघाटन करण्यात येणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
पहिल्या टप्प्यात पुणे येथील येरवडा तुरूंगात पर्यटन सुरू करणार असून दुसर्या टप्प्यात नाशिक, मुंबई या कारागृहात सुरू करण्याचा विचार असल्याचे देशमुख यांनी सांगितले. विद्यार्थ्यांना कारागृहात पर्यटन करण्याकरिता ५ रूपये प्रवेश शुल्क आकारले जाणार आहे. तर अभ्यासकांना ५० रूपये शुल्क आकारणी करण्यात येणार आहे.