अकोला – महिला आर्थिक विकास महामंडळ (माविमं) व कारखेडा येथील गोट बॅंक ऑफ कारखेडा यांच्या सामंजस्य करार झाला असून स्त्रीधन शेळीपालन योजनेद्वारे शेळीपालनात महिलांचा सहभाग वाढविणार असल्याचे माविमंच्या अध्यक्ष श्रीमती ज्योतीताई ठाकरे यांनी आज येथे सांगितले.
कारखेडा येथे आज एका कार्यक्रमात माविमंच्या अध्यक्ष ज्योतीताई ठाकरे यांच्या उपस्थितीत महिलांना शेळी वाटप योजनेचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी विधानसभा सदस्य आ. नितीन देशमुख, स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्थेचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. अनिल भिकाने, डॉ. गिरीश पंचभाई, माविमं चे विभागीय समन्वय अधिकारी केशव पवार,अकोला जिल्हा समन्वयक वर्षा खोब्रागडे, वाशीम जिल्हा समन्व्यक राजेश नागपुरे, बुलडाणा समन्वयक सुमेध तायडे, अमरावतीचे अनिल सोले, यवतमाळचे रंजन वानखडे, गोट वॅंक ऑफ कारखेडा चे अध्यक्ष नरेश देशमुख, उपाध्यक्ष के. जी. देशमुख आदी उपस्थित होते.
यावेळी श्रीमती ठाकरे म्हणाल्या की, बचत गटाच्या महिलांना एक गर्भार बकरी पालनासाठी देण्यात येणार आहे. त्यातून या महिलांनी शेळी संगोपन करुन आपला आर्थिक उन्नती करावयाची आहे. यासाठी माविमं ने सामंजस्य करार केला असून अमरावती, अकोला व पालघर या तीन जिल्ह्यात ही स्त्रीधन शेळीपालन योजना राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक नरेश देशमुख यांनी केले. सूत्रसंचालन मनोज देशमुख यांनी तर आभार प्रदर्शन वर्षा खोब्रागडे यांनी केले. कार्यक्रमाला बचत गटांच्या महिला उपस्थित होत्या. श्रीमती ठाकरे यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात दोघा महिलांना शेळी वाटप करण्यात आले. तसेच कोरोना काळात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिलांचा सत्कारही करण्यात आला.