यवतमाळ : मंगलाष्टके सुरू होणारच तितक्यात प्रियकर आला आणि ही माझी प्रेयसी आहे, असे सांगताच नवरदेवाने पोलिस ठाणे गाठले तर नववधू भोवळ येऊन पडली. या प्रकाराने अक्षता पडण्यापूर्वीच सुखी संसाराचे स्वप्न भंगले. एखाद्या चित्रपटात शोभावी अशी घटना यवतमाळ शहरात घडली.
विवाहाची पूर्ण तयारी झाली. वर्हाडी मंडपात दाखल झाले. नववधू साजश्रृंगार करून भावी आयुष्याची स्वप्न बघत बोहल्यावर चढली. मंगलाष्टके सुरू होणार तितक्यात एक तरुण मंडपात आला आणि ही माझी प्रेयसी आहे, असे म्हणत गोंधळ घातला. एकाएकी घडलेल्या प्रकारामुळे नवरदेवासह नातेवाइकांची भंबेरी उडाली तर, नववधू भोवळ येऊन खाली पडली.
लग्न म्हणजे दोन जिवाचे मिलन. आयुष्यभराची जोडी जोडण्यासाठी दोन परिवार एकत्र आले. त्यांनी रविवारी (ता.१७) विवाहाची तिथी ठरविली. अमरावती जिल्ह्यातील पिंपळगाव (निपाणी) येथील नवरदेवाची वरात उमरसरा परिसरातील मराठी शाळेत दाखल झाली. विवाहाची वेळ जवळ येऊन ठेपल्याने वधूकडील मंडळी कामात व्यस्त होती. तर, वराकडील मंडळीही आनंदात होते. मात्र, अचानक एक तरुण मंडपात आला आणि अवघ्या काही क्षणात आनंदावर विरजण पडले. बोहल्यावर चढलेल्या तरुणीकडे बघून तरुणाने ही माझी प्रेयसी आहे, असे म्हणताच गोंधळलेल्या परिस्थितीत नवरदेवाकडील मंडळींनी थेट अवधूतवाडी पोलिस ठाणे गाठले आणि घडलेली हकीकत पोलिसांना सांगितली. नवरी नेण्यासाठी आलेले वऱ्हाडी दु:खी अंतःकरणाने आपल्या गावाकडे माघारी फिरले. तो तरुण मुलीच्या नात्यातीलच असल्याची माहिती आहे. हा धक्का सहन न झाल्याने नववधू भोवळ येऊन खाली कोसळली. तिला नातेवाईकांनी रुग्णालयात दाखल केले. एका तरुणाच्या अचानक एन्ट्रीमुळे सुखी संसार सुरू होण्यापूर्वीच मोडला.