ग्रामपंचायत निवडणूक निकालानंतर एक महिन्याच्या आत सरपंचपदाच्या आरक्षणाची सोडत काढली जाईल, अशी घोषणा ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी सोमवारी काल (दि.१९) केली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंग पाळण्यासाठी घालण्यात आलेली ग्रामसभांवरील स्थगिती हटविण्यात आली आहे. मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून ग्रामपंचायतींना पूर्वीप्रमाणे ग्रामसभांचे आयोजन करण्यास संमती देण्यात आल्याचीही माहिती मुश्रीफ यांनी दिली.
मुश्रीफ म्हणाले की, राज्यातील सुमारे 14 हजार ग्रामपंचायतींचे निकाल सोमवारी लागले. यात राज्यातील जनतेने महाविकास आघाडीला भरभरून दान दिले. आघाडी सरकारच्या कारभाराला लोकांनी दिलेली पसंती आहे. ग्रामपंचायत निकालानंतर 1 महिन्याच्या आत सरपंचपदाच्या आरक्षणाची सोडत काढली जाईल. आरक्षण सोडत निवडणूक निकालानंतर काढण्याचे अनेक फायदे दिसत आहेत.
लोकांनाही ही पद्धत आवडल्याचे दिसून येत आहे. राज्यात सरासरी 80 टक्के मतदान या निवडणुकीत झाले. बोगस दाखले काढून निवडणूक लढविल्या जायच्या. त्याला आता प्रतिबंध बसल्याचे दिसते.