अकोला : कोविड लसीकरणाला जिल्ह्यात सकारात्मक वातावरणात सुरुवात झाली, मात्र लसीकरणाच्या दुसऱ्या दिवशी रविवारी सकाळी दोन महिला कर्मचाऱ्यांची प्रकृती बिघडल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली. या दोन्ही महिला कर्मचाऱ्यांवर सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती आता स्थिर आहे. लसीकरणानंतर ही लक्षणे सामान्य असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे घाबरून जाण्याचे कारण नसल्याचेही वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.
जिल्ह्यात शनिवारी कोविड लसीकरण यशस्वीपणे पार पडले. पहिल्यांदाच कोविडची लस घेणार असल्याने काही कर्मचाऱ्यांमध्ये धाकधुकीचे वातावरण होते, मात्र काही वेळातच सर्वांनी न घाबरता लस घेतली. लसीकरणाची प्रक्रिया पूर्ण होईस्तोवर सर्वकाही सुरळीत होते. मात्र, लसीकरणाच्या दुसऱ्या दिवशी रविवारी सकाळी दोन महिला कर्मचाऱ्यांच्या प्रकृतीत बिघाड झाल्याची माहिती समोर आली. यातील एक महिला वैद्यकीय कर्मचारी असून, त्यांना थंडी वाजून ताप आला, तर दुसरी महिला आशासेविका असून, त्यांना थकवा आल्याचे सांगण्यात येत आहे. दोघांनाही तत्काळ सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या दोन्ही महिला कर्मचारी ३० ते ३४ वर्षे वयोगटातील असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दोन्ही महिला कर्मचाऱ्यांवर उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय सूत्रांचे म्हणणे आहे.
इतरही लोकांना ‘रिॲक्शन’ –
या दोन महिला कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त ज्या लाभार्थ्यांनी लस घेतली, अशा आणखी काहींना रविवारी लसीची रिॲक्शन झाल्याची माहिती समोर आली आहे. वैद्यकीय सूत्रांच्या मते लस घेणाऱ्या व्यक्तींना हलका ताप, अंगदुखी, लस घेतलेल्या जागी दुखणे अशी सौम्य लक्षणे आढळून आली. या प्रकारची सौम्य लक्षणे येणे साहजिक असून, नागरिकांनी घाबरून जाण्याची गरज नसल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. ‘फिव्हर’ हा लसीकरणाचा एक भाग आहे. इतर लसीकरणामध्येही या प्रकारची सौम्य लक्षणे आढळतात. त्यामुळे घाबरून जाण्याचे कारण नाही. औषधोपचाराने कर्मचाऱ्यांची प्रकृती स्थिर आहे. घाबरण्याचे कारण नाही.
– डॉ. आरती कुलवाल, वैद्यकीय अधीक्षक, जिल्हा स्त्री रुग्णालय, अकाेला