मुंबई : कायद्यापेक्षा कोणतीही व्यक्ती मोठी नाही.कायदा कुणासोबतही भेदभाव करणार,असे विधान राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले आहे. सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रकरणावर अनिल देशमुख यांनी पहिल्यांदाच भाष्य केले. मुंबईत आज प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते. कायद्यासमोर कोणताही मंत्री मोठा नाही,असे सूचक विधानही त्यांनी केले.दरम्यान, या प्रकरणी राष्ट्रवादीने तूर्तास धंनजय मुंडे यांचा राजीनामा न घेण्याचा निर्णय घेतला आहे.
धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या आरोपांमुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ माजली आहे.सत्ताधारी तसेच विरोधकांच्या यावर प्रतिक्रिया येत असताना गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही यासंदर्भात भाष्य केले आहे. महाराष्ट्रामध्ये कायदा कुणाच्याही बाबतीत भेदभाव करणार नाही.आमचे पोलीस खाते योग्यप्रकारे चौकशी करून जो कुणी दोषी असेल त्यावर कारवाई करेल. कायदा हा सर्वांसाठी समान आहे,असे अनिल देशमुख म्हणाले. मात्र धंनजय मुंडे यांच्यावर एफआयआर दाखल कधी होणार असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर कायदेशीर कारवाई सुरू असून त्यानुसार कारवाई होईल, असे थोडक्यात उत्तर देत अनिल देशमुख यांनी यावर अधिक बोलणे टाळले.
बलात्काराच्या आरोपानंतर धनंजय मुंडे यांच्यावर टीका होत असताना या प्रकरणाला आता एक वेगळे वळण लागले आहे. मुंडे यांच्यावर आरोप करणारी रेणू शर्मा हिच्याविरोधात भाजप आणि मनसेच्या नेत्यांनी उलट तक्रार दाखल केली आहे. संबंधित महिलेने आपल्याला अडकवण्याचा प्रयत्न केला असल्याची तक्रार भाजपचे माजी आमदार कृष्णा हेगडे यांनी केली आहे. त्या पाठोपाठच मनसे नेते मनीष धुरी यांनी देखील या महिलेविरोधात तक्रार दाखल केली आहे. इतकेच नव्हे तर जेट एअरवेजच्या एका माजी अधिकाऱ्याने देखील या महिलेबाबत अशीच तक्रार केली आहे. परंतु आपण कुणालाही फसवले नसल्याचे रेणू शर्माने म्हटले आहे. त्यामुळे हे प्रकरण आता अधिकच किचकट होताना दिसत आहे.