जिल्ह्यात शुक्रवार 15 जानेवारी रोजी सकाळ पासूनच 214 ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान होणार असून ,गुरूवार 14 च्या दुपारीच अधिकारी व कर्मचारी हे आपआपल्या मतदान केंद्राकडे रवाना झाले होते. यासाठी मोठ्या संख्येत एस.टी.बस, जीप व खाजगी वाहनांचा वापर करण्यात आला. ग्रामपंचायत निवडणुकीच्या दृष्टीने शुक्रवारी मतदान केंद्र व गाव पातळीवर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी प्रशासन दक्ष आहे.
शुक्रवार 15 जानेवारी रोजी सकाळी 7.30 ते 5.30 या वेळेत मतदान होणार असून जिल्ह्यात 4 लाख 62 हजार 247 मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावतील. जिल्ह्यात 214 ग्रामपंचायतीसाठी 1,741 जागांवर मतदान होणार आहे. यासाठी 4,411 उमेदवार रिंगणात आहेत. जिल्ह्यात 2 लाख 40 हजार 969 पुरुष मतदार आणि 2 लाख 22 हजार 270 स्त्री मतदार मतदान करतील. जिल्ह्यात 851 मतदान केंद्र असून त्या पैकी 220 मतदान केंद्र हे संवेदनशील आहेत. 4 हजार 114 कर्मचारी मतदानाची प्रक्रिया पार पाडतील.