मुंबई : चेतन ननावरे
सर्दी, खोकला आणि ताप अशा कोरोनाच्या प्राथमिक लक्षणांची धास्ती घेतल्याने 2020 सालात चिल्ड बिअरकडे तळीरामांनी पाठ फिरवल्याची माहिती समोर आली आहे. राज्यात 2019च्या तुलनेत 2020मध्ये बिअरच्या विक्रीत तब्बल 45 टक्क्यांची घट झाल्यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या महसुलात मोठी घट झाली आहे. दुसरीकडे देशी आणि विदेशी मद्य रिचवणार्या तळीरामांनी 2020मध्ये 80 टक्के विक्रीचा टप्पा ओलांडल्याने उत्पादन शुल्क विभागाच्या महसुलात चांगलीच भर पडली आहे.
याउलट गरम किंवा मध्यम स्वरूपात थंड असलेली बिअर पिण्यात मजा नसल्याचे काही तळीरामांनी सांगितले. त्यामुळे लॉकडाऊनमध्ये काही तळीरामांनी दारूलाच रामराम केला असून काहींनी दुसरा पर्याय निवडल्याचे स्पष्ट होते. याचबरोबर लॉकडाऊनच्या काळात अनेकांच्या नोकर्या गेल्या. अनेक लोकांनी निम्मा पगार मिळाला. साहजिकच या गोष्टीचा परिणाम मद्यपींवर झाला. सर्वसाधारणपणे बिअरसाठी जास्त पैसे मोजावे लागतात. त्यापेक्षा कमी किंमतीत इतर प्रकारची दारू मिळते. या दारूने नशाही अधिक होते. या कारणास्तव अनेक मद्यपींनी बिअर घेणे थांबवल्याचीही माहिती पुढे आली आहे. यासारखी अनेक कारणे असल्याने बिअरची विक्री कमी झाल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, 2019च्या तुलनेत 2020 सालात फक्त 55.72 टक्के बिअर विकली गेली आहे. सर्वात जास्त पसंती तळीरामांनी विदेशी दारूला दिली आहे. विदेशी दारूने 2020 साली 84.97 टक्क्यांपर्यंत विक्री केली आहे.
याउलट वाईनची विक्री 82.80 टक्के, तर देशी दारूची विक्री 80.43 टक्क्यांपर्यंत झाली आहे. सर्वच प्रकारच्या मद्यांच्या विक्रीत घट झाल्याने उत्पादन शुल्क विभागाच्या महसुलातही 11 हजार 554 कोटी रुपयांवरून 9 हजार 747 कोटी रुपयांपर्यंत घट झाली आहे. परिणामी, महसुल वाढीसाठी बनावट मद्याविरोधातील कारवाई अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.
राज्यात बनावट कारवाई वेग घेणार
राज्याच्या तिजोरीत उत्पादन शुल्क विभागाच्या महसुलामुळे मोठी भर पडते. आर्थिक वर्षात उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या कमाईनुसार दरवर्षी वित्त विभागाकडून करवसुलीचे उद्दिष्ट ठरवले जाते. त्यानुसार 2020-21 या आर्थिक वर्षासाठी उत्पादन शुल्क विभागास 19 हजार कोटी रुपये महसूल गोळा करण्याचे उद्दिष्ट दिल्याचे समजते. त्या तुलनेत आत्तापर्यंत 9 ते 10 हजार कोटी रुपये जमा झाले आहेत. त्यामुळे अधिकाधिक महसूल गोळा करण्यासाठी बनावट मद्याविरोधातील कारवाई अधिक जोर धरण्याची शक्यता आहे.