नवी दिल्ली : देशात १६ जानेवारीपासून देशात कोरोना लसीकरण सुरु होणार आहे. आज याबाबत केंद्र सरकारकडून माहिती देण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना आणि कोरोना लसीकरणाचा आढावा घेतला. संक्रांत पार पडल्यानंतर लसीकरणाला सुरुवात होईल. पहिल्यांदा आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन कर्मचारी यांना पहिल्यांदा प्राधान्य देण्यात येणार आहे. जवळपास यामध्ये ३ कोटी लोकांना लस टोचली जाईल.
तत्पूर्वी,आज कोरोना संसर्गावरील एक नव्हे तर दोन ‘मेड इन इंडिया’ लसींद्वाvaरे मानवता वाचविण्यास भारत तयार असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी (दि.९) रोजी प्रवासी भ्रष्टाचार दिवस कार्यक्रमात बोलताना केले आहे. कोरोना संसर्गामुळे जगभरातील अर्थव्यवस्थांमध्ये हाहाकार उडाला असून सार्वजनिक आरोग्य यंत्रणा मोडकळीत निघण्याची भीती निर्माण झाली आहे असेही नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले.
असंख्य देशात कोरोनाने मोठ्या प्रमाणात जीवितहानी चालविली आहे. मात्र, जगात भारताचा मृत्यूदर सर्वात कमी आहे. तर रिकव्हरी दर सर्वात जास्त आहे असे नरेंद्र मोदी यांनी यावेळी स्पष्ट केले. आत्मनिर्भर भारताच्या निर्मितीमध्ये प्रत्येकजण आपापल्या परीने योगदान देऊ शकतो असे सांगत नरेंद्र मोदी पुढे म्हणाले की, जगाच्या कानाकोपऱ्यात भारतीय लोक पसरलेले आहेत. पण ‘मां भारती’मुळे आणि कोरोना विरुद्धच्या लढ्यामुळे ते मनाने जोडले गेले आहेत. प्रवासी भारतीय अर्थात जगाच्या विविध भागात पसरलेला भारतीय नागरिक आज इंटरनेटमुळे एकमेकांच्या संपर्कात आहे. मागचे एक वर्ष केवळ देशवासियांसाठी नव्हे तर प्रवासी भारतीयांसाठी खडतर गेले आहेत. अशा खडतर आणि आव्हानात्मक स्थितीत देखील भारतीय मूळ असणाऱ्या नागरिकांनी आपले कर्तव्य बजावले आहे. आपणा सर्वांसाठी हा अभिमानाचा विषय आहे.
तसेच जगभरात पसरलेल्या भारतीय नागरीकांनी ‘नो इंडिया क्विझ’ स्पर्धेत हिरिरीने सहभाग घेतला आहे. भाग घेतलेल्या नागरिकांची संख्या पाहिली तर अजूनही प्रवासी भारतीयांनी देशाशी असलेली नाळ तोडलेली नसल्याचे दिसून येते. विशेषतः युवा प्रवासी भारतीय यासाठी अभिनंदनास पात्र असल्याचे असे ही नरेंद्र मोदी यांनी नमूद केले. दक्षिण अमेरिकेतील सुरीनाम देशाचे अध्यक्ष चंद्रिकाप्रसाद संतोखी यांच्या उपस्थितीत प्रवासी भ्रष्टाचार दिवस कार्यक्रम पार पडला.
देशातील लोकशाही सर्वात जिवंत
अमेरिकेत सुरु असलेल्या गदारोळाच्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी यांनी भारताची लोकशाही सर्वात जिवंत असल्याचे सांगितले. देशाच्या सामर्थ्याकडे जेव्हाही प्रश्नार्थक नजरेने पाहण्यात आले. तेव्हा भारताने त्याला योग्य उत्तर दिले आहे. तसेच भारत जेव्हा पारतंत्र्यात होता, तेव्हा युरोपमध्ये भारत कधीही स्वतंत्र होऊ शकत नाही, असे म्हटले जात होते. मात्र, भारतीयांनी हा भ्रम तोडून टाकला. भारत जेव्हा स्वतंत्र झाला तेव्हा पश्चिमेचे लोक गरीब भारत एकसंध राहू शकणार नाही, येथे लोकशाही टिकणार नाही, असे म्हणू लागले. पण भारताने हा भ्रमही फोल ठरविला. आज भारतातील लोकशाही सर्वात सफल आणि सर्वात जिवंत आहे. वेळ शांततेची असो वा संघर्षाची, प्रत्येकवेळी देशाने त्याचा खंबीरपणे मुकाबला केला असल्याचे नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितले आहे.