अकोला – सन २०२१-२२ या हंगामासाठी बागायती, जिरायती, रब्बी पिकांसाठी तसेच दुग्ध व्यवसाय, शेळी पालन, कुक्कुटपालन व मत्स्य व्यवसायाकरीता पीक कर्जदरात वाढ करण्यास जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत आज मंजूरी देण्यात आली.
सन २०२१-२२ या हंगामाचे पीक कर्ज वाटपाचे कर्जदर तसेच पतपुरवठा धोरण निश्चित करण्यासाठी नाबार्डच्या सुचनेनुसार जिल्हाधिकारी यांच्या दालनात जिल्हास्तरीय तांत्रिक समितीच्या सभेचे आयोजन करण्यात आले. यावेळी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी उदयकुमार नलावडे, सहकार विभागाचे जिल्हा उपनिबंधक राजेंद्र पालेकर, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक अलोक तरानिया, नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक शरद वाळके, मत्स व्यवसाय विभागाचे जिल्हा उपायुक्त बडीहवेली, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ए.एल. वैद्य आदी उपस्थित होते.
यावेळी समितीने केलेल्या शिफारशीनुसार कापूस बागायत साठी प्रति हेक्टरी सहा हजार रुपये, खरीप ज्वार बागायत प्रति हेक्टरी एक हजार रुपये, सोयाबीन दोन हजार रुपये, कोरडवाहू हरभरा तीन हजार रुपये इ. प्रमाणे पीक कर्जदारात वाढ करण्याची शिफारस मंजूर करण्यात आली. तसेच खरीप पिकासाठी कर्ज उचल कालावधी दि.१ एप्रिल ते १४ ऑगस्ट तर परतफेडीचा अंतिम दिनांक ३१ मार्च, रब्बी पिकासाठी कर्ज उचल कालावधी दि.१ ऑक्टोबर ते ३१ डिसेंबर तर परतफेडीचा दिनांक ३० जून तर बागायती पिकांसाठी पीक लागवडीच्या कालावधीनुसार कर्ज उचल कालावधी असून परत फेडीचा दिनांक पीक लागवडीपासून १८ महिन्यापर्यंत निश्चित करण्यास मंजुरी देण्यात आली.