नवी दिल्ली : देशाला २०२० हे संपूर्ण वर्ष कोरोना संकटात गेले असतानाच नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी देशवासियांना कोरोना लस मोफत देण्याची घोषणा केली. तथापि, त्यांनी तासाभरातच स्पष्टीकरण दिले आहे. कोरोनाच्या पहिल्या टप्प्यात देशभरातील १ कोटी आरोग्य कर्मचारी आणि २ कोटी फ्रंटलाईन वर्कर्सना दिली जाणार आहे. त्यानंतर उर्वरित २७ कोटी लाभार्थ्यांना कोरोना लसीकरण कोणत्या पद्धतीने करायचे याचा आराखडा जुलैपर्यंत निश्चित केला जाईल, असे स्पष्टीकरण डॉ. हर्षवर्धन यांनी दिले आहे.
देशात कोरोना लस तयार करण्याची तयारी वाढविण्यात आली आहे. कोरोना लसीच्या तयारीचे मूल्यांकन करण्यासाठी शनिवारी देशभरात या लसीची रंगीत तालीम घेण्यात आली. या विशेष प्रसंगी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी देशभरातील सर्व भारतीयांना कोरोना लस विनामूल्य देण्यात येणार असल्याची मोठी घोषणा केली, पण त्यानंतर त्यांनी तासाभरात खुलासा केला.
तथापि, सर्व नागरिकांना कोरोना लस मिळणार नाही. सर्व भारतीयांना लसी देण्याची गरज भासणार नाही, असे सरकारने यापूर्वी कित्येक प्रसंगी स्पष्ट केले आहे. केवळ माफक लोकसंख्येला कोरोना लस दिली जाईल ज्यामुळे समूह प्रतिकारशक्ती निर्माण होऊन कोरोनाची साखळी तुटली जाईल. ज्यांना लस दिली जाईल, त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचे पैसै स्वीकारले जाणार नाहीत.
केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या एकूण ११६ जिल्ह्यांमध्ये २५९ ठिकाणी कोविड-१९ ची रंगीत तालीम घेतली. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन स्वत: दिल्लीतील जीटीबी रुग्णालयात लसीचा आढावा घेण्यासाठी गेले होते.