नवी दिल्ली : राष्ट्रीय महामार्गावरील फास्टॅगच्या वापराला केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने 15 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ दिली आहे. टोल वसुलीसाठी फास्टॅग प्रणालीचा अवलंब करणे केंद्र सरकारने सक्तीचे केले असून, 1 जानेवारीपासून ही प्रणाली सक्तीची होणार होती. मात्र त्याला आता 15 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
सर्व प्रकारची चारचाकी वाहने तसेच व्यापारी वाहनांसाठी फास्टॅग सक्तीचे करण्यात आले आहे. फास्टॅगद्वारे सध्या होणारी टोलवसुली 75 ते 80 टक्के इतकी आहे. येत्या काही काळात ही वसुली शंभर टक्क्यांवर नेण्याचे उद्दिष्ट आहे. सर्व टोल नाक्यांवर एक लेन वगळता इतर सर्व लेन फास्टटॅगने युक्त होणार आहेत. फास्टॅगशिवाय जी वाहने येतील, त्यांना सिंगल लेनमधून प्रवेश दिला जाईल. मात्र त्यांच्याकडून दुप्पट टोल वसुली केली जाणार आहे. टोल नाक्यावर डिजिटल पेमेंट व्यवस्था अर्थात फास्टॅगचा अवलंब केल्यामुळे वाहनांच्या रांगा लागणार नाहीत, तसेच इंधनाची मोठ्या प्रमाणावर बचत होईल, असे राष्ट्रीय रस्ते महामार्ग प्राधिकरण अर्थात एनएचएआयचे म्हणणे आहे. 1 डिसेंबर 2017 सालात ज्या वाहनांची विक्री करण्यात आली आहे, त्यांच्यासाठी सरकारने या आधीच फास्टॅग सक्तीचे केलेले आहे.