नवी दिल्ली : कोरोना संक्रमणामुळे २०२० या वर्षात निराशा, चिंता होती. चोहीकडे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. मात्र, २०२१ वर्ष उपचाराची नवी आशा घेऊन येत आहे. लसीसाठी भारतात आवश्यक तयारी वेगाने सुरु आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. गुजरातमधील राजकोटमध्ये एम्स रुग्णालयाच्या भूमीपूजनावेळी पंतप्रधान बोलत होते.
अनेक अडचणींनी भरलेल्या या वर्षाने दाखविले की कठीण काळात भारत जर एकजूट झाला तर मोठ्यातल्या मोठ्या संकटाचा सामना आपण प्रभावीपणे करु शकतो. त्यासाठी वर्षाचा शेवटचा दिवस भारतातील लाखो डॉक्टर्स, हेल्थ वॉरियर्स, सफाई कामगार, औषध दुकानांत काम करणारे आणि फ्रंट लाइन कोरोना वॉरियर्स प्रती कृतज्ञता व्यक्त करणारा आहे. भारताने एकजुटतेने वेळेवर प्रभावी पावले उचलली. त्याचा परिणाम म्हणजे आज आम्ही चांगल्या स्थितीत आहोत. देशाची लोकसंख्या १३० कोटींपेक्षा अधिक आहे. यातील सुमारे १ कोटी लोकांनी कोरोनाची लढाई जिंकली आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
आरोग्याला जेव्हा दुखापत होते तर जीवनातील प्रत्येक घटक प्रभावित होतो. केवळ कुटुंब नाही तर संपूर्ण सामाजिक क्षेत्रावर त्याचा परिणाम होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
भारतात कोरोनावरील लस सर्व गरजू घटकांपर्यंत पोहोचावी यासाठीची तयारी अंतिम टप्प्यात आहे. लसीबाबत देशवासीयांना वेळोवेळी सूचना दिली जाईल. मात्र, जोपर्यंत लस नाही तोपर्यंत ढिलाई नाही, असे आवाहन त्यांनी केले.