नवी दिल्ली : एक जानेवारीपासून काही नियमांमध्ये बदल होत आहेत. याचा थेट परिणाम सामान्य जनतेवर होणार आहे. चेक पेमेंट ते फास्टॅग, यूपीआय पेमेंट सिस्टीम, जीएसटी रिटर्नच्या नियमांमध्ये बदल आदी बाबींचा समावेश आहे.
कॉन्टॅक्टलेस कार्ड ट्रांजेक्शन
आरबीआयने कॉन्टॅक्टलेस कार्ड पेमेंटची मर्यादा ५ हजार केली आहे. डेबिट आणि क्रेडिट कार्डसाठी ५ हजारपर्यंतच्या पेमेंटसाठी पिन टाकावे लागणार नाही. ही सिस्टिम १ जानेवारीपासून लागू होईल.
शून्य लावून कॉल
एक जानेवारीपासून लँडलाईनवरून कोणत्याही मोबाईल नंबरवर फोन करणार असाल तर त्यासाठी आधी शून्य लावावे लागेल. विना शून्य आपला कॉल लागणार नाही. ही नवीन यंत्रणा राबवण्यासाठी दूरसंचार विभागाने कंपन्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत.
चेक पेमेंट सिस्टम
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने १ जानेवारी २०२१ पासून चेकच्या माध्यमातून पॉझिटिव्ह पे सिस्टिम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. हा नवीन नियम लागू झाल्यानंतर ५० हजार आणि त्यापेक्षा अधिक रक्कम चेकच्या माध्यमातून पेमेंट करण्यासाठी ही प्रणाली लागू होईल. यामध्ये चेक जारी करणाऱ्याच्या माहितीची दुसऱ्यांदा पुष्टी केली जाईल. चेक देणाऱ्याला चेक नंबर, चेक डेट, कुणाला पेमेंट केलं आहे त्याचा खाते क्रमांक, रक्कम आदी माहिती द्यावी लागेल. चेक पेमेंटमधील फ्रॉड रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
जीएसटी रिटर्न
नव्या नियमांच्या अंतर्गत ज्या व्यावसायिकांचा टर्नओव्हर पाच कोटी रुपयांपेक्षा कमी आहे. त्यांना प्रत्येक महिन्याला रिटर्न फाईल दाखल करावी लागणार नाही. वर्षातून चार वेळा त्यांना GST रिटर्न फाईल करावी लागेल.