गडचिरोली : पुढील वर्षात राज्यातील विविध विभागांमध्ये असलेल्या संपूर्ण रिक्त जागा भरण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असल्याची माहिती मदत व पुनर्वसन तथा बहुजन विकास मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज कुरखेडा येथे दिली. तालुका काँग्रेस कमिटी व महाविकास आघाडीच्या वतीने आयोजित नगरपंचायत आणि ग्रामपंचायतस्तरीय ग्रामीण कार्यकर्ता व चर्चासत्र मेळाव्यादरम्यान आयोजित नागरी सत्काराला उत्तर देताना वडेट्टीवार बोलत होते.
श्री.वडेट्टीवार म्हणाले की, कोरोनामुळे राज्याची तिजोरी रिकामी आहे. त्यामुळे विनाअनुदानित महाविद्यालयातील शिक्षकांना वेतन देऊ शकलो नाही. मात्र, पुढील आर्थिक वर्षात त्यांना नक्की वेतन मिळेल.
काँग्रेसने तयार केलेली देशातील रेल्वे आणि विमानतळे विकण्याचे कार्य केंद्रातील भाजप सरकार करीत असल्याची टीका वडेट्टीवार यांनी केली गडचिरोली जिल्ह्यातील रेल्वेसाठी केंद्र सरकारने प्रथम आपला अर्धा वाटा द्यावा, त्यानंतर राज्य सरकार अर्धा वाटा देईल, असेही ते म्हणाले.
येत्या नगरपंचायतीच्या निवडणुकीत कुरखेडा नगरपंचायतीत काँग्रेसच्या हाती सत्ता दिल्यास राज्य सरकारकडून २५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देऊ, अशी घोषणाही त्यांनी केली. याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य अजय कंकडालवार, विधान परिषद सदस्य अॅड.अभिजित वंजारी, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ.नामदेव उसेंडी, माजी आमदार आनंदराव गेडाम, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष मनोहर पोरेटी, कुरखेडा-कोरची नगरपंचायत निवडणुकीचे निरीक्षक योगेंद्र भगत उपस्थित होते.