बाळापूर – अकोला जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुक 2020-21 कार्यक्रम घोषीत झाला असून ग्रामपंचायतच्या राखीव जागांवर निवडणूक लढवण्यासाठी जात वैधता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी इच्छुक उमेदवारांना प्रयत्नांची पराकाष्ठा करून जीवाचा आटापिटा करावा लागत आहे . जात वैधता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी संबंधित कार्यालयात हजारोनी अर्ज प्राप्त होत आहेत . जात पडताळणीचा प्रस्ताव स्वीकृतीची अंतिम तारीख 30 डिसेंबर असल्याने जात पडताळणी कार्यालय व संबंधित निवडणूक कार्यालय शासकीय सुट्टीच्या दिवशी 25 डिसेंबर ते 27 डिसेंबर 2020 या कालावधीत कार्यालयीन वेळेत सुरु राहिल, असे वृत्त जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त तथा सदस्य यांनी केले असल्याची माहिती जिल्हा माहिती कार्यालय अकोला ह्यांनी स्थानिक वृत्त पत्रांद्वारे प्रकाशित केले . परंतु शासकीय कार्यालयामधील जवाबदारी असणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांच्या बेपर्वाईमुळे उमेदवारांची कशी ससेहोलपट होत आहे ह्याची प्रचीती बाळापूर तहसील कार्यालयात वसिष्ठ कात्रे यांना आली .
आगामी ग्रामपंचायत निवडणूकची उमेदवारी दाखलकरण्याची अंतिम तारीख तोंडावर आली असतांना ,उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी व विविध कागदपत्रे गोळा करण्यात इच्छुक उमेदवारांची दमछाक होत आहे .अश्यातच बाळापूर तहसील कार्यालय संबंधित अधिकाऱ्यांनी वाऱ्यावर सोडलेअसल्याचे चित्र आज दिनांक २७/१२/२०२० ला दिसून आले. जिल्हा माहिती कार्यालयातर्फे देण्यात आलेल्या माहिती प्रमाणे जात पडताळणी कार्यालय शासकीय सुट्टीच्या दिवशी कार्यालयीन वेळेत सुरु राहिल असे प्रसिद्ध केले त्या अनुषंगाने आज जिल्ह्यातील तहसील कार्यालय बाळापूर सुरु राहणे अपेक्षित असतांना . जात पडताळणी प्रस्तावाच्य कामकाजाने श्री वसिष्ठ कात्रे हे तहसील कार्यालय बाळापूर येथे दुपारी २ वाजता गेले असता नायब तहसीलदार (निवडणूक) श्री . ए . स . सोनोने तसेच इतर कोणीही सक्षम ,जवाबदार प्रशासकीय अधिकारी उपस्थित नसल्याचे दिसून आले . ह्याबाबत कार्यालयीन कर्मचारी श्री देहलीवाले ह्यांच्या कडे विचारणा केली असता त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली . भ्रमणध्वनीद्वारे श्री सोनोने यांना संपर्क केला असता आपण शुक्रवार शनिवार व आज कार्यालयात उपस्थित होतो परंतु आता मी रजेवर आहे , कार्यलयाला सुट्टी आहे , तहसीलदार साहेब येतील , दौऱ्यावर आहेत अशी थातुरमातुर उत्तरे दिली . ह्याबाबत निवासी उपजिल्हाधिकारी श्री खडसे यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी तहसीलदार साहेब हे जेवण करण्यासाठी गेले असून लवकरच कार्यालयात पोहोचत आहेत अशी सारवा-सारव करून वेळ मारून नेली . तहसीलदार , नायब तहसीलदार यांची प्रदीर्घ प्रतीक्षा करून सुद्धा सायंकाळी ५:२३ वाजेपर्यंत तहसील कार्यालयात तहसीलदार अथवा नायब तहसीलदार उपस्थित झाले नाहीत , ह्याबाबत पुन्हा निवासी उपजिल्हाधिकारी श्री खडसे ह्यांना सांगितले असता त्यांनी उद्या या असे सांगितले, ह्याबाबत संबंधित बेजवाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कार्यवाही कारण्याबात तक्रार महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाकडे दाखल करणार असल्याची माहिती श्री वसिष्ठ कात्रे ह्यांनी दिली . ह्यावेळी बाळापूर तालुक्यातील जात पडताळणी प्रस्तावाच्या कामकाजासाठी ताटकळत असलेल्या भावी लोकप्रतिनिधिंच्या तीव्र संतापाच्या भावना प्रतिक्रिया उमटत होत्या .