नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दुपारी १२ वाजता शेतकऱ्यांच्या खात्यात शेतकरी सन्मान निधीचा पुढचा हप्ता पाठवणार आहेत. याअंतर्गत देशातील एकूण ९ कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात एकूण १८ हजार कोटी रुपये जमा होणार आहेत.
पंतप्रधान मोदी यावेळी देशातील सहा राज्यांमधील शेतकऱ्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधणार आहेत. देशाचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची आज जयंती आहे. यानिमित्तानं पंतप्रधान मोदी देशातील शेतकऱ्यांना शेतकरी सन्मान योजनेचा ७ वा हप्ता भेट देणार आहेत. शेतकरी सन्मान योजनेबाबतची माहिती आणि काही आठवणी पंतप्रधान मोदी यावेळी शेतकऱ्यांना सांगणार आहेत. यावेळी केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर देखील उपस्थित असणार आहेत.
देशात ठिकठिकाणी ‘किसान चौपाल’
पंतप्रधान मोदींच्या संबोधनासाठी देशाच्या विविध क्षेत्रात भाजपचे मंत्री आणि खासदार कामाला लागले आहेत. भाजपने या कार्यक्रमासाठी ‘किसाम चौपाल’ तयार केले आहेत. भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा यांनी सर्व कार्यकर्त्यांना या कार्यक्रमास सामील होण्याचे आदेश दिले आहेत.