मुंबई : राज्यात पुनःश्च हरि ओम अंतर्गत टाळेबंदीतून काहीशी सूट राज्य सरकारकडून दिली जात आहे. या पार्श्वभूमीवर पर्यटनासाठी आणखी काही गोष्टींना परवानगी देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यानुसार राज्यात कंटेन्मेंट झोन बाहेरील जलक्रीडा (वॉटरस्पोर्ट्स), नौकाविहार, अॅम्यूझमेंट पार्क,पर्यटन स्थळी इनडोअर मनोरंजन कार्यक्रमांना परवानगी देण्यात आली आहे.या संदर्भातील परिपत्रक जारी करण्यात आले आहे.या सर्व गोष्टी करताना कोरोना संदर्भातील सर्व नियमांचे पालन करणे अनिवार्य असणार आहे.
वर्षाचा शेवट अधिक गोड करण्यासाठी राज्य सरकारने ही काहीशी सूट दिली असून अनेकांना दिलासा मिळाला आहे. विशेषकरून लॉकडाऊननंतर व्यावसायिकांना याचा चांगला फायदा होणार आहे. कंटेन्मेंट झोनबाहेर येणाऱ्या पर्यटन स्थळांना ही सूट मिळाली आहे. मात्र असे असले तरी नागरिकांना कोरोनासंदर्भातील नियमांचे पालन करणे गरजेचे असेल. मास्क वापरणे, वारंवार हात धुणे, सामाजिक अंतर पाळणे या सर्व नियमांचे पालन करूनच मौज मजा करावी लागणार आहे.
दरम्यान, कोरोनाची खबदारी घेत असताना ब्रिटनमध्ये या विषाणूचा नवा प्रकार आढळला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात आधीपासूनच याची खबरदारी घेतली जात आहे. नाताळ सण आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी लोक उत्साहाने घराबाहेर पडतात. अशावेळी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे खबदारीच्या उपाययोजनांसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी बैठक घेतली होती. त्यानुसार महापालिका क्षेत्रात रात्री ११ ते पहाटे ६ वाजेपर्यंत संचारबंदी असणार आहे. याचे नागरिकांनी पालन करणे आवश्यक असल्याचे आवाहन सरकारने केले आहे.