अकोला : जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सिकलसेल रुग्ण आढळल्याने या विषयी प्रत्येकाने खबरदारी घ्यायला हवी आहे. यासाठी आरोग्य यंत्रणेबरोबर नागरिकांनी देखील दक्षता घ्यावी अशी स्थिती आहे. गेल्या वर्षी 54 जणांना सिकलसेल असल्याचे आढळून आले होते. यंदा जिल्ह्यात 142 रुग्णांचे अहवाल हे सिकलसेल बाधित आल्याचे नुकत्याच केलेल्या वैद्यकीय तपासणीत उघड झाले आहे.
जिल्ह्यात सध्या सिकलसेल जनजागृती सप्ताह सुरु आहे. पण, या सप्ताहात 142 रुग्ण आढळल्याने जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेला सतर्क होत काम करावे लागणार आहे. जिल्ह्यातील 13 हजार 815 जणांची चाचणी करण्यात आली. त्यात 142 जणांचे वैद्यकीय चाचणी अहवाल सिकलसेलच्या दृष्टीने बाधितचे आले आहेत. या रुग्णांची आता ‘एचबी-इलेक्ट्रो फोरेसीस’ तपासणी केली जाणार असून, त्यानंतरच वाहक आणि बाधित रुग्णांची संख्या कळणार आहे.
सिकलसेल जनजागृती सप्ताहांतर्गत शुक्रवार 11डिसेंबर पासून जिल्ह्यात सिकलसेल जनजागृती आणि तपासणी मोहिमेस सुरुवात झाली. लग्नापूर्वी 30 वर्ष वयोगटातील युवक-युवतींनी सिकलसेलची चाचणी करून घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागा मार्फत करण्यात आले आहे.
सिकलसेल नियंत्रण कार्यक्रमांतर्गत गत दहा वर्षात जिल्ह्यातील 7 लाख, 39 हजार 141 व्यक्तींची तपासणी करण्यात आली. यामध्ये 9 हजार 731 जण या तपासणीत बाधित आढळून आले असून, यातील 4020 हे सिकलसेल वाहक, तर 200 सिकलसेलचे रुग्ण आहेत. सिकलसेल आजार नियंत्रण कार्यक्रम 2011-12 पासून जिल्ह्यातील सर्वच आरोग्य संस्थांमध्ये राबविण्यास सुरुवात करण्यात आली.
सिकलसेल आजार कार्यक्रमांतर्गत जनतेमधील या आजाराचे प्रमाण शोधणे, जास्तीत जास्त लोकांची तपासणी करणे, सिकलसेल रुग्णांनी दुसर्या वाहक किंवा रुग्णाशी विवाह टाळावा, यासाठी विवाहपूर्व समुपदेशन करणे, सिकलसेल रुग्णांना रुग्णालय स्तरावर परिणाम व नियमित उपचार उपलब्ध करून देणे, रुग्णालय स्तरावर मोफत औषधोपचार व समुपदेशन करणे या उद्देशाने राबविण्यात येत आहे.