अकोला : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम…किसान) योजनेंतर्गत आयकर भरणाऱ्या आणि अपात्र लाभार्थी शेतकऱ्यांकडून त्यांनी घेतलेल्या लाभाची रक्कम वसूल करण्यात येत आहे. त्यामध्ये १७ डिसेंबरपर्यंत जिल्ह्यातील ८९५ शेतकऱ्यांकडून ८१ लाख ८२ हजार रुपये वसूल करण्यात आले.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत ऑनलाइन अर्ज भरलेल्या पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात प्रतिवर्ष तीन समान हप्त्यात प्रति हप्ता दोन हजार रुपयांची रक्कम जमा करण्यात येते. त्यामध्ये आयकर भरणारे लाभार्थी शेतकरी व चुकीची माहिती सादर करणाऱ्या अपात्र शेतकऱ्यांकडून त्यांनी योजनेंतर्गत घेतलेल्या लाभाची रक्कम वसूल करण्याचे आदेश शासनामार्फत जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. त्यानुसार जिल्ह्यातील आयकर भरणारे ४ हजार २३५ आणि अपात्र ५ हजार ८७८ अशा एकूण १० हजार ११३ शेतकऱ्यांकडून ७ कोटी ७४ लाख ३८ हजार रुपयांची रक्कम वसूल करण्याची कार्यवाही प्रशासनामार्फत सुरू आहे. त्यामध्ये १७ डिसेंबरपर्यंत जिल्ह्यातील ८९५ शेतकऱ्यांकडून ८१ लाख ८२ हजार रुपयांची रक्कम वसूल करण्यात आली. त्यामध्ये आयकर भरणारे ८३० व अपात्र ६५ शेतकऱ्यांचा समावेश आहे. जिल्ह्यातील उर्वरित ९ हजार २१८ शेतकऱ्यांकडून ६ कोटी ९२ लाख ५६ हजार रुपयांची रक्कम वसूल करण्याची कार्यवाही सुरू आहे.
रक्कम वसूल केलेल्या शेतकऱ्यांची अशी आहे संख्या !
तालुका शेतकरी
अकोला २१५
अकोट ७७
बाळापूर १६९
बार्शिटाकळी १३६
मूर्तिजापूर १३८
पातूर ४९
तेल्हारा १११
…………………………………………….
एकूण ८९५
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत शासनाच्या आदेशानुसार आयकर भरणारे व अपात्र शेतकऱ्यांकडून त्यांनी घेतलेल्या लाभाची रक्कम वसूल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. १७ डिसेंबरपर्यंत जिल्ह्यातील ८९५ शेतकऱ्यांकडून ८१ लाख ८२ हजार रुपयांची रक्कम वसूल करण्यात आली आहे.
– संजय खडसे, निवासी उपजिल्हाधिकारी