अकोला : राज्यात केवळ महिलांसाठी असलेल्या मुंबईतील कामा वैद्यकीय महाविद्यालयात कोरोनाग्रस्त रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण हे सर्वाधिक आहे. त्या खालोखाल कोरोनाग्रस्त रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अकोला वैद्यकीय महाविद्यालयाचे आहे. त्यानुसार अकोल्याचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात दुसर्या स्थानी आहे. कामा रुग्णालयात रूग्ण दुरूस्त होण्याचे प्रमाण 98 टक्के आहे. तर अकोल्यात हेच प्रमाण 90 टक्के आहे. मात्र कामा महाविद्यालयात केवळ 670 रुग्णांवर उपचार झाले. तर त्याच वेळी अकोला वैद्यकीय महाविद्यालयात 4523 रुग्णांवर उपचार करण्यात आले. हे विशेष. राज्यातील इतर रुग्णालयांचा रूग्ण बरे होण्याचा दर हा 60 ते 80 टक्के आहे.
राज्यात कोरोना रुग्ण बरे होण्यात अकोल्याचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अग्रेसर आहे. त्यामुळे येथे रुग्णांची भरती होण्याची संख्या देखील मोठी आहे. अकोल्यात 4 हजार 523 कोरोना रुग्णांपैकी 4 हजार 95 रुग्णांवर यशस्वी उपचार करत त्यांना स्वगृही पाठविले गेले. त्याच बरोबर अकोल्याचा मृत्यूदर देखील आटोक्यात असून तो 8.20 टक्के इतका आहे. त्याच वेळी राज्यातील इतर वैद्यकीय महाविद्यालयात रुग्णांचा मृत्यूदर हा दहा ते चाळीस टक्के आहे. कोरोना संकटात अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये 4,523 रुग्णांपैकी 371 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.त्यात बाहेर जिल्ह्यातील कोरोना रूग्णांचा देखिल समावेश आहे. तर त्याच वेळी मुंबईतील कामा रुग्णालयात 670 रुग्णांपैकी केवळ एका महिलेचा मृत्यू झाला.
कोरोनाग्रस्त रुग्णांवर राज्यात नागपूर नंतर अकोल्याच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सर्वाधिक रुग्ण उपचारार्थ दाखल होते. असे असताना राज्य पातळीवर मृत्यू दर आटोक्यात आणत दुसर्यास्थानी राहणार्या अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामधील रुग्ण सेवा ही आता राज्यात चर्चिली जात आहे. येथील रुग्ण कल्याणार्थ काम करणार्या सर्वच वैद्यकीय अधिकार्यांसोबत वैद्यकीय महाविद्यालय प्रशासन, परिचारिका, इतर वैद्यकीय सेवा देणार्या प्रत्येकाचे यात मोठे योगदान आहे.
अकोल्यातील उपचार प्रणालीची देखील या निमित्त राज्यात चर्चिली जात आहे. राज्यात सरासरी रुग्ण बरे होण्याचा दर 80 टक्के असून त्या तुलनेत दहा टक्के अधिक म्हणजेच 90.54 दर अकोल्याच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा आहे. कोरोनाच्या दुसर्या लाटेची शक्यता गृहीत धरून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने तयारी केली असून अकोल्यातील सुपरस्पेशालिटी हॉस्पीटल सुरू झाल्यास रुग्ण कल्याणार्थ मोठे काम येथे होईल असे सांगण्यात येत आहे.