नवी दिल्ली : केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी रस्ते वाहतुकीसंदर्भात मोठी घोषणा केली आहे. पुढील दोन वर्षात टोलनाक्यांपासून मुक्तता होईल असे त्यांनी जाहीर केल्याने वाहतूधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे. पुढील दोन वर्षात महामार्गांवर कोणताही टोलनाका नसेल, यामुळे वाहनांना पैसे भरण्यासाठी थांबण्याची किंवा वाहनाची गती कमी करण्याची गरज नाही, असे नितिन गडकरी यांनी सांगितले आहे.
अॅसोचॅम कॉन्फरन्समध्ये बोलत असताना गडकरी यांनी मंत्रालय सध्या जीपीएस यंत्रणेच्या सहाय्याने टोल वसूल करण्याच्या प्रस्तावावर काम करत असल्याची माहिती दिली. सर्व नवी वाहनं जीपीएस सिस्टमशी जोडले जातील असे त्यांनी यावेळी सांगितले. जीपीएस यंत्रणेच्या सहाय्याने बस तसेच ट्रक चालकांकडून टोल वसूल केला जाणार आहे. जीपीएस यंत्रणा या वाहनांनी किती अंतर पार केले आहे याचे मोजमाप करन आपोआप टोलची रक्कम वसूल केली जाईल.
तसेच, नितीन गडकरी यांनी चालू आर्थिक वर्षात राष्ट्रीय महामार्गावर वसूल होणाऱ्या टोलची रक्कम ३४ हजार कोटी इतकी असेल अशी माहिती दिली आहे. गतवर्षी ही रक्कम २४ हजार कोटी इतकी होती असेही त्यांनी सांगितले.