नवी दिल्ली : केंद्र सरकारने केलेले सुधारित कृषी कायदे तूर्त स्थगित ठेवण्याची सूचना सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी सरकारला केली. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय कृषीमंत्र्यांनी लिहिलेले पत्र ट्विट शेतकरी आंदोलकांना आवाहन केले आहे.
केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी आठ पानी पत्र लिहित शेतकऱ्यांशी सवांद साधण्याचा प्रयत्न केला आहे. हेच पत्र ट्विट करत पंतप्रधान मोदी यांनी शेतकऱ्यांना हे पत्र वाचण्याचे आवाहन केले आहे. ‘कृषीमंत्री नरेंद्र तोमर यांनी शेतकरी बंधू भगिणींना पत्र लिहून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. नम्रपणे संवाद साधण्याचा एक प्रयत्न केला आहे. सर्व अन्नदात्यांनी हे पत्र वाचावं असा माझा आग्रह आहे. देशवासीयांना आग्रह आहे की, हे पत्र त्यांनी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवावं,” असे नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
नव्या कृषी कायद्यांमुळे शेतकऱ्यांना कोणते फायदे होणार आहेत याबाबत तोमर यांनी शेतकऱ्यांना संबोधित करत चर्चा केली आहे. तोमर यांचे हे पत्र ८ पानी असून आपण ते शेतकऱ्यांमधील संभ्रम दूर करण्यासाठी लिहिले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
तोमर यांच्या पत्रातील महत्वाचे मुद्दे :
- शेतकऱ्यांमध्ये भ्रम तयार केला जात आहे.
- मी शेतकरी कुटुंबातूनच आलेलो आहे.
- शेतकरी आणि सरकारमध्ये भिंत उभी केली जात आहे.
- नवे कायदे लागू झाल्यामुळे यावेळी एमएसपीवर सरकारी खरेदीचे मागील सर्व विक्रम मोडले गेले आहे.
- सरकारने गेल्या ६ वर्षांमध्ये एमएसपीद्वारे जवळजळ दुप्पट रक्कम शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविली.
- एमएसपी सुरू आहे आणि सुरू राहील.
- मंडी सुरू आहेत आणि एपीएमसीला अधिक मजबूत केले जाईल.
- खुला बाजार घरबसल्या पिकाला चांगली किंमत देईल.
- मंडीचा पर्याय देखील असेलच.
- कृषी मंड्यांचे आधुनिकीकरण करणार.
- शेतकऱ्यांची जमीन हिरावून घेतली जाणार नाही, मालकी हक्क शेतकऱ्यांचाच राहील.
- शेतकऱ्यांच्या आडून राजकीय पक्षांचे ‘कुचक्र’ सुरू आहे.