तेल्हारा(प्रा विकास दामोदर) – तेल्हारा पंचायत समितीत प्रभारी गट विकास अधिकारी आहेत हा प्रभार येथीलच कृषी अधिकारी यांच्याकडे आहे. यांचा कर्मचाऱ्यावर पाहिजे तसा दबदबा नाही. गट विकास अधिकारी अकोला येथे मिटिंगला असल्यास काही प्रामाणिक जसे की आवक -जावक विभाग, आस्थापना विभाग व कंत्राटी कर्मचारी वगळले तर बहुतांश कर्मचारी कार्यालयात हजर नसतात, शिपायांकडे विचारणा केल्यास साहेव मीटिंगला गेले आहेत किंवा साहेब ट्रेनिंग वर गेलेले आहेत अशी उत्तरे मिळतात.आता प्रश्न इथे हा उद्भवतो की जवळपास सर्वच जवाबदार अधिकाऱ्यांची मिटिंग व ट्रेनिंग एकत्रित असते का? जर असेलच तर सुटी का जाहीर केल्या जात नाही दूर दूरचे लाभार्थी येऊन परत जातात त्यांना नाहक शारीरिक, मानसिक, आर्थिक हाल सोसावे लागतात. एवढे असूनही मस्टरवर मात्र सर्व कर्मचाऱ्यांची हजेरी असते. परिणामी कार्यालयातील कामे खोळंबतात नेमका येथूनच भ्रष्टचारचा उगम होतो.
प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना, शबरी आवास योजना ह्या शासनाच्या गरिंबांसाठी घरकुल योजना राबविणे चालू असून या योजनामध्ये कित्येक लोकांचे 10 ते 12 महिन्यापासून हप्तेच पडत नसून जो कुणी चिरीमिरी देणार त्याचेच हप्ते लवकर व हमखास पडतात.यासाठी देखील विशिष्ट साखळी आहे. या साखळीच्या माध्यमातून लाभार्थ्यांची आर्थिक पिळवणूक केली जाते. त्रुटींच्या नावाखाली लेखाधिकारी जवळपास 5ते 6 महिने फाईल पुढे सरकवत नाही शेवटी कर्जबाजारी झालेल्या लाभार्थ्याला शरण यावे लागते. याच पंचायत समितीत जो ठेकेदार लेखा विभागाला चिरीमिरी देईल त्याचे बिल लवकर निघते व जो देणार नाही त्याला मात्र ताटकळत बसावे लागते. घरकुल जिओ टॅग करणाऱ्या कंत्राटी गृह अभियंत्यांना महिन्याचे विशिष्ट टार्गेट दिल्या जाते व ते टार्गेट जो पूर्ण करेल त्याच्या फाईल्स विनाअडचणी पासिंग होतात व जो गृह अभियंता टार्गेट पूर्ण करणार नाही त्याच्या फाईलीमध्ये मुद्दाम त्रुटी काढल्या जातात. त्याच त्रुटीयूक्त फाईलचे आधीचे 2,3 हप्ते नियमित पडतात मात्र 4 थ्या किंवा 5व्या हप्त्याला अचानक त्यामध्ये त्रुटी येतात.या संदर्भातील तक्रार करण्यास सहसा कुणी धजावत नाही.
तरी वरिष्टांनी यात जातीने लक्ष घालून या बेताल, बेशिस्त, व लोभी अधिकाऱ्यांना आवर घालून गोरगरीब घरकुल लाभार्थ्यांना न्याय मिळवून द्यावा हीच सर्वसामान्यांची अपेक्षा आहे. व दांड्या मारणाऱ्या कर्मचाऱ्यांवर योग्य ती कार्यवाही झाल्यास भष्टचाराला कुठंतरी काही प्रमाणात आळा बसेल अशी जनमानसात चर्चा आहे