अकोला – शासनाची महत्वाकांक्षी शिवभोजन थाळी योजना जिल्ह्यातील गरजूंना उपयुक्त ठरली असून आतापर्यंत आठ लाखांहून अधिक गरजू लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयातून प्राप्त झाली आहे.
शिवभोजन थाळी ही योजना प्रथम प्रायोगिक तत्वावर 26 जानेवारी 2020 पासून सुरु झाली असून या योजनेअंतर्गत गरीब व गरजु लोकांना नियमीतपणे शिवभोजन थाळींचा लाभ घेत आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील 13 केंद्रामधुन जवळपास 8 लक्ष 22 हजार लाभार्थींना शिवभोजन थाळीचे वितरण करण्यात आले आहे.
शहरी भागात आपल्या विविध कामानिमित्त येणाऱ्या गोरगरिबांसाठी स्वस्त दरात स्वच्छ, पोषक आणि ताजे भोजन देणारी ही योजना असून त्याचा लाभ गरीब आणि गरजू जनतेला होत आहेत. विशेषत: ग्रामीण भागातून शहरात कामासाठी येणाऱ्या गोरगरीब जनतेला केवळ पाच रुपयांत पोटभर जेवण देणारी ही योजना आहे. या शिवभोजन थाळीमध्ये 30 ग्रॅमच्या दोन चपाती, 100 ग्रॅमची एक वाटी भाजी, 150 ग्रॅमचा एक मूद भात आणि 100 ग्रॅमचे एक वाटी वरण इतके भोजन देण्यात येतो.
शिव भोजन थाळी योजनेला लोकांनी भरघोस प्रतिसाद देत आहे. योजनेच्या सुरूवातीच्या काळात गरीब आणि गरजू व्यक्तींना फक्त 10 रुपये इतक्या कमी दरात जेवण उपलब्ध करून देण्यात आले. आता कोविड संसर्गाच्या पार्श्वभुमिवर शासनाने या थाळीचा दर नाममात्र 5 रूपये इतका केला आहे.
कोविड-19 चे लॉकडाऊनच्या काळात गरीब व गरजु लोकांना या योजनेचा मोठ्या प्रमाणात लाभ झाला असून 1 एप्रिल 2020 पासून अकोला जिल्ह्यातील सर्व तालुक्याच्या मुख्यालयी शिवभोजन केंद्र सुरु करण्यात आले आहे. यामध्ये अकोला शहर व बार्शीटाकळी येथे प्रत्येकी तीन ठिकाणी, मुर्तिजापूर व तेल्हारा येथे प्रत्येकी दोन ठिकाणी तर अकोट, बाळापूर, पातूर येथे प्रत्येकी एक याप्रमाणे एकूण 13 ठिकाणी शिवभोजन केंद्र सुरु आहेत.