कृषी कायदे ऐतिहासिकच असून, शेतकर्यांच्या हिताचे आहेत, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी येथे केले. या कायद्यांविरोधात काही विरोधी पक्ष स्वत:च्या स्वार्थासाठी शेतकर्यांच्या मनात संभ्रम निर्माण करीत आहेत. देशाला बदनाम करण्याच्या कटाचा हा फार मोठा भाग आहे, असा आरोपही पंतप्रधानांनी केला.
या कायद्यांबाबत शेतकर्यांच्या मनात असलेला कुठलाही संशय दूर करण्यासाठी आपले सरकार वचनबद्ध आहे. शेतकर्यांनी विरोधकांच्या कटात न सापडता चर्चेचा मार्ग स्वीकारावा. माझे सरकार शेतकर्यांसाठी समर्पित आहे. त्यांचे नुकसान कदापि करणार नाही; उलट सर्व बंधनांतून मुक्त करून, त्यांच्या उत्पन्नात वाढच होणार आहे, असे पंतप्रधान म्हणाले. गुजरातच्या सीमावर्ती कच्छ जिल्ह्यात पंतप्रधानांनी आज काही महत्त्वाच्या प्रकल्पांची पायाभरणी केली. यानंतर ते जाहीर सभेत बोलत होते.
भाजपाने आतापर्यंत शेतकर्यांचे हितच साधले आहे, असे स्पष्ट करताना त्यांनी गुजरातमधील दोन क्षेत्रांचे उदाहरण दिले. सरकारच्या कुठल्याही हस्तक्षेपाशिवाय दुग्ध व्यवसाय आणि मासेमार हे दोन क्षेत्र फुलले आहेत. या क्षेत्रांमधील व्यवसाय सहकारी क्षेत्रातील लोक आणि शेतकर्यांकडूनच केला जातो, असे त्यांनी सांगितले.
मी हे उदाहरण यासाठी देत आहे, कारण केंद्राने सप्टेंबरमध्ये पारित केलेले तीन कृषी कायदेदेखील शेतकर्यांसाठी हिताचे आहेत. बाजारपेठांमधील बाह्य हस्तक्षेप यामुळे संपुष्टात येणार आहे. दलालांच्या विळख्यातून शेतकरी मुक्त होणार असून, ते आपला माल स्वत: किंमत ठरवून विकू शकणार आहेत. मात्र, यामुळे अनेकांच्या दुकानदार्या बंद होणार असल्याने, ते शेतकर्यांच्या मनात गोंधळ निर्माण करीत आहेत. मुळातच अस्तित्वात नसलेली भीती त्यांना दाखवत आहेत आणि शेतकरी त्यांच्या या जाळ्यात अडकले आहेत, असे पंतप्रधान म्हणाले.
शेतकर्यांशी साधला संवाद
यावेळी पंतप्रधानांनी कच्छ जिल्ह्यातून आलेल्या शेतकर्यांशी संवाद साधला. यात कच्छ येथे स्थायिक झालेल्या पंजाबमधील शेतकर्यांचाही समावेश होता. शेतकर्यांनी या बैठकीत कृषी कायद्यांचे समर्थन करताना, हे कायदे रद्द केले जाऊ नये, अशी विनंती केली.
हायब्रिड अक्षय ऊर्जा प्रकल्पाची पायाभरणी
पंतप्रधानांनी येथे हायब्रिड अक्षय ऊर्जा प्रकल्पाची पायाभरणी केली. या प्रकल्पात दीड लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार असून, यामुळे एक लाख लोकांना रोजगार मिळणार आहे, अशी ग्वाही त्यांनी दिली.