टोलनाक्यांवरून जाणार्या सर्व गाड्यांसाठी फास्टॅग अनिवार्य करण्यात आले आहे. 1 जानेवारीपासून फास्टॅग नसलेल्या वाहनांकडून टोल नाक्यांवर दुप्पट टोल वसूल केला जाणार आहे.
15 डिसेंबरपासून सर्व टोलनाके कॅशलेस करण्यात आले आहेत. या दरम्यान रोखीचे व्यवहार करणारी केंद्रेही सुरू राहणार असली, तरी फास्टॅग नववर्षापासून अनिवार्य असेल. फास्टॅगबद्दल वाहनचालकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी टोल नाक्यांवरील कर्मचार्यांकडून प्रयत्न केले जात आहेत. अद्यापही अनेक गाड्यांवर फास्टॅग दिसत नसल्याचे टोल नाक्यांवरील कर्मचार्यांना दिसून आले आहे.
टोलनाके कॅशलेस झाल्याने तसेच फास्टॅग नियमामुळे कर्मचार्यांसोबतच वाहनचालकांचादेखील वेळ वाचणार आहे. टोल नाक्यांवरील गर्दी अतिशय कमी होईल. आपत्कालीन स्थितीत कुणालाही टोल नाक्यांवरील रांगेत राहण्याची गरज नसेल. फास्टॅगसाठी विशिष्ट खाते तयार केले जाईल, त्यातून टोलचे पैसे आपोआप कपात होणार आहेत. टोलनाक्यांवर वाहनाची ओळखही होणार आहे. यातील रक्कम संपल्यानंतर फास्टॅगला पुन्हा रिचार्ज करावा लागणार आहे.
1 जानेवारीपासून सर्व चारचाकी वाहनांसाठी फास्टॅग अनिवार्य राहणार असून, केंद्रीय रस्ते परिवहन आणि राष्ट्रीय महामार्ग मंत्रालयाने या संदर्भात परिपत्रक काढले आहे. हा नियम 1 डिसेंबर 2017 च्या आधी खरेदी झालेल्या वाहनांनाही लागू असणार आहे.