एमसीएल अंतर्गत शीलाबाई शेतकरी उत्पादन संघटनेच्या पुढाकाराने भारतातील पहिले सीएनजी युनिट पातूर तालुक्यात उभारण्यात येणार आहे. तालुक्यातील शीलाबाई प्रोड्युसर कंपनी लिमिटेड, तालुक्यातील बायोफ्युएल कंपनी, शीला क्लीनफ्युएल लिमिटेड, एमसीएल, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने पातूर तालुक्यातील सुमारे एक लक्ष कि.ग्रॅ. दररोज निर्मिती क्षमतेच्या बायो-सीएनजी प्रकल्पाची सुरुवात होत आहे. तालुक्यात स्वच्छ इंधन बायोफ्युएल व कँसर केमिकलमुक्त सेंद्रिय शेती या दोन क्षेत्रांचा विकास या प्रकल्पाद्वारे करण्यात येणार आहे. सदर प्रकल्पामुळे संपूर्ण तालुक्याला इंधनामध्ये स्वयंपूर्ण करणार असून, त्यामध्ये वाहतुकीचे इंधन पेट्रोल, डिझेल, खनिज, सीएनजी या आंतरराष्ट्रीय गुणवत्तेच्या इंधनाची निर्मिती करण्यात येणार आहे. स्वच्छ इंधनामुळे तालुका प्रदूषणमुक्त होण्यासाठी मदत होणार आहे. सदर इंधन निर्मितीसाठी लागणारा कच्चा माल शेतातच निर्माण होणार असून, कर्जमुक्त अशा करार शेतीमार्फत शेतकाऱ्यांसाठी शाश्वत व चांगले उत्पन्न देऊन तालुक्यातील शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी कार्य होणार आहे. या प्रकल्पांतर्गत सुमारे २ हजार हेक्टर ते एक लाख हेक्टरपर्यंत करार शेती करण्यात येणार आहे. सदर प्रकल्पामुळे अंदाजित २ हजारांवर रोजगार तालुक्यात निर्माण होणार आहे. व्यवसायांच्या माध्यमातून तालुक्यातील प्रत्येक कुटुंबामध्ये शाश्वत व कायमचे उत्पन्न देण्याचा प्रयत्न राहणार आहे, अशी माहिती संचालक छगन राठोड यांनी दिली.
या प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळा १६ डिसेंबर रोजी सकाळी होणार आहे. या सोहळ्याचे अध्यक्ष डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले राहतील. कार्यक्रमाला मार्गदर्शक म्हणून मुंबईचे उपजिल्हाधिकारी डॉ. शाम शिवाजी घोलप, आमदार नितीन देशमुख, आमदार अमोल मिटकरी, जिल्हा परिषद उपाध्यक्ष सावित्री राठोड, पातूर पंचायत समिती सभापती लक्ष्मी डाखोरे, जिल्हा परिषद सदस्य अर्चना राऊत, पातूर पंचायत समिती उपसभापती नजम उन्निसा मोहम्मद इब्राहिम, कृषी विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. महेंद्र नागदेवे, वनविभागाचे उपवनसंरक्षक विजय माने, तालुका कृषी अधिकारी विनोद शिंदे, एकात्मिक बालविकास अधिकारी समाधान राठोड, ठाणेदार हरीश गवळी, राहुल वाघ, आरोग्य अधिकारी विजय जाधव राहणार आहेत. विशेष उपस्थिती म्हणून कार्थिक रावल, किशोर राठोड, रणजित दातीर, वैभव चव्हाण, छगन राठोड आदी प्रामुख्याने उपस्थित राहतील.