कोरोनामुळे स्थगित केलेल्या राज्यातील 14 हजार 234 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून 15 जानेवारी रोजी मतदान होऊन 18 जानेवारी मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीची नोटीस 15 डिसेंबर रोजी संबंधित तहसीलदारांकडून प्रसिद्ध केली जाणार आहे.
कोरोना महामारीमुळे मुदत संपलेल्या राज्यातील 14 हजार 234 ग्रामपंचायतींच्या निवडणूका जानेवारीच्या दुसर्या आठवड्यात होतील, असे वृत्त पुढारीने प्रसिद्ध केले होते. हे वृत्त खरे ठरले आहेत. राज्य निवडणूक आयोगाचे सचिव किरण कुरूंदकर यांनी 11 जानेवारीरोजी 20 एप्रिल ते 20 डिसेंबर दरम्यान मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींचा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. 23 डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार असून 31 डिसेंबरला छाननी होईल. 4 जानेवारील उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत असून 15 जानेवारी रोजी मतदान होणार आहे.
औरंगाबाद विभागातील 4 हजार 134 ग्रामपंचायतींचा समावेश असून पुणे विभागात 2 हजार 870, नाशिक विभाग 2 हजार 476, अमरावती विभाग 2 हजार 448, नागपूर विभाग 1 हजार 508 आणि कोकण विभागातील 798 ग्रामपंचायतींचा समावेश आहे. कोकणातील ठाणे जिल्ह्यातील 158 ग्रामपंचायती, पालघर 3, रायगड 88, रत्नागिरी 479 आणि सिंधुदुर्ग 70 ग्रामपंचायतींचा समावेश आहे. तर कोल्हापूर जिल्ह्यातील 433, सांगली 152, सातारा 879, सोलापूर 658 आणि पुणे जिल्ह्यातील 748 ग्रामपंचायतींचा समावेश आहे.