अकोट : अकोट तालुक्यातील सुकळी गावात पतीने पत्नीची हत्या केल्याची घटना गुरुवार १० डिसेंबरच्या मध्यरात्री घडल्याचे उघडकीस आली. या प्रकरणी अकोट ग्रामीण पोलिसांनी आरोपी पतीस ताब्यात घेतले आहे. हत्येमागे अनैतिक संबंधाची किनार असल्याचे कळते.
सूत्रांनी दिलेल्या माहितीवरून घटनेची हकीकत अशी की, पती सिध्दार्थ जगन्नाथ धुंदे याने गुरुवारी रात्री किरकोळ वादातून लोखंडी पाईपने पत्नी शितल हिला मारहाण केली. यामध्ये शितल हिला जबर मार लागल्यामुळे तीचा जागीच कोसळून मृत्यू झाला.
परिस्थिती जन्य पुरावा आणि गुन्ह्यात वापरलेल्या वस्तू यावरून आरोपी पती सिध्दार्थ धुंदे याला पत्नीची हत्या केल्याच्या आरोपाखाली अकोट ग्रामीण पोलीसांनी ताब्यात घेतले. हत्या करण्या मागे नेमका काय उद्देश होता, कशामुळे हत्या केली आदी प्रश्नांची उकल करण्यास पोलीस यंत्रणा पुढील तपास करीत आहेत. घटनेची माहिती मिळताच अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार ज्ञानोबा फड व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते.